टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर मेरी कोमच्या सामन्यादरम्यान सावळा गोंधळ पहायला मिळाला. आपल्या पहिल्या फेरीचा सामना जिंकल्यानंतर मेरी कोमसमोर दुसऱ्या फेरीत कोलंबियाच्या इन्ग्रिट वेलेन्सियाचं आव्हान होतं. वेलेन्सियाने या सामन्यात बाजी मारत मेरीचं आव्हान संपवलं. परंतू पंचांचा निर्णय समजण्यात गफलत झालेल्या मेरी कोमला आपण सामना जिंकला आहे असं वाटलं.
ADVERTISEMENT
इतकच नव्हे तर सामना संपल्यानंतर मेरी कोमने उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला, डोप टेस्ट दिली. यामध्ये दोन तासाचां कालावधी गेल्यानंतर मेरीला आपला पराभव झाल्याचं समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सोशल मीडियावर मेरीला आपला विजय झालेला नसून पराभव झाल्याचं कळलं. नेमकं असं काय झालं की पंचांनी निर्णय आपल्या विरुद्ध दिला हेच मला कळालं नसल्याचं मेरीने सांगितलं.
आतापर्यंतच्या आयुष्यातलं हे सर्वात वाईट ऑलिम्पिक असल्याची प्रतिक्रिया मेरी कोमने दिली. “पंचांना नेमका काय प्रॉब्लेम होता हे मला खरंच कळत नाहीये. हे काय सुरु आहे हेच मला कळत नाहीये. आता काय करायचं हे देखील मला माहिती नाही. त्यांनी आधीच सांगितलं होतं की या स्पर्धेत तुम्ही एखाद्या निर्णयाविरुद्ध अपील करु शकणार नाही. पंचांनी दिलेले निर्णय बदलले जाणार नाहीत. त्यामुळे आता मी काहीच करु शकणार नाहीये.”
बॉक्सिंग मॅचमध्ये विविध देशांचे ५ पंच असतात. खेळाडूचं तंत्र, त्याची शैली आणि संपूर्ण सामन्यात तो किती प्रभाव टाकतो या निकषांवर तिन्ही पंच आपले गूण देतात. जो बॉक्सर सामन्यावर आपलं वर्चस्व राखतो त्याला १० गुण मिळतात तर दुसऱ्या स्पर्धकाला ७ ते ९ दरम्यान गुण मिळतात. काही ठिकाणी पाच पंचांचं एकमत होतं तर काही ठिकाणी हा निर्णय बहुमताच्या आधारावर दिला जातो. मेरी कोमचा निर्णयही बहुमताच्या आधारावरच दिला गेला.
पहिला सेट गमावल्यानंतर मेरी कोमने दुसरा आणि तिसरा सेट बहुमताच्या आधारावर जिंकला. ५ पैकी ३ पंचांनी निर्णय हा मेरी कोमच्या बाजूने दिला. परंतू ज्यावेळी संपूर्ण सामन्याचा निकाल घोषित करण्याची वेळ आली त्यावेळी पंचांनी व्हेलेन्सियाला विजयी घोषित केलं. त्यामुळे पंचाच्या या निर्णयावर भारतीय चाहत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आयोजनाच्या दृष्टीकोनातून यंदाचं ऑलिम्पिक हे अतिशय वाईट असल्याची टीका मेरी कोमने केली. आयोजक हे खेळाडूंशी अत्यंत उर्मटपणे वागत आहेत. मीडियाशी बोलतानाही नीट सहकार्य मिळत नाहीये, असं मेरी कोम म्हणाली. ऑलिम्पिकमधला प्रवास संपला असला तरीही मेरी कोमने निवृत्तीचा विचार केला नाहीये. मी अद्याप दोन वर्ष तरी खेळेन असा मला विश्वास आहे. माझं पुढचं लक्ष्य हे राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांचं आहे. ऑलिम्पिकबद्दलचा विचार मी नंतर करेन असंही मेरी कोम म्हणाली.
Tokyo Olympic 2020 : Mary Kom चं आव्हान संपुष्टात, कोलंबियाच्या बॉक्सरने केली मात
ADVERTISEMENT