टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला हॉकी संघालाही पराभवाचा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय महिला हॉकी संघावर अर्जेंटिनाच्या महिलांनी २-१ ने मात केली. सामन्यात आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिला नंतर गोल करण्यात अपयशी ठरल्या. दुसरीकडे अर्जेंटिनाने आपला सर्व अनुभव पाणाला लावत पिछाडी भरुन काढत आघाडी घेत अखेरपर्यंत ती कायम राखली. भारतीय महिलांनाही आता पुरुष संघाप्रमाणे कांस्यपदकासाठी खेळावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियावर मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाकडून तमाम क्रीडाप्रेमींना खूप अपेक्षा होत्या. भारतीय महिलांनीही या अपेक्षांना साजेसा खेळ करत दुसऱ्याच मिनीटाला सामन्यात आघाडी घेतली. ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारतीय महिलांनी अर्जेंटिनाला दडपणाखाली आणत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. भारतीय बचावपटूंनीही अर्जेंटिनाचं आक्रमण परतावून लावत आपली आघाडी कायम राहिली.
परंतू ही आघाडी कायम राखणं भारतीय महिलांना जमलं नाही. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाच्या महिलांनी सामन्यात बरोबरी साधली. १८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनाची कॅप्टन मारीया नोएल बारीओन्युवोने गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवत भारतीय महिलांना दडपणाखाली आणलं. परंतू भारतीय बचावपटूंनी भारतीय गोलपोस्ट सुरक्षीत ठेवला. अखेरीस कर्णधार राणी रामपाल, वंदना कटारिया यांनी बॉलवर ताबा मिळवण्यात यश मिळवलं. दुसरं सत्र संपत असताना भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या दोन संधी आल्या होत्या. परंतू या संधी वाया गेल्या. यानंतर अर्जेंटिनानेही सामन्यात आघाडी घेण्याचे प्रयत्न केले परंतू ते देखील फोल ठरले.
तिसऱ्या सत्रातही दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करत होते. दोन्ही संघाच्या बचावफळीतल्या खेळाडूंनी आपापले गोलपोस्ट सुरक्षित ठेवले होते. अखेरीस अर्जेंटिनाने पुन्हा एकदा गोलपोस्टवरची कोंडी फोडत सामन्यात आघाडी घेतली. कर्णधार मारीया नोएल बारीओन्युवोने ३६ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा बचाव भेदत गोल केला. या गोलसह अर्जेंटिनाने सामन्यात २-१ ने आघाडी घेत भारतीय महिलांना बॅकफूटला ढकललं. दरम्यानच्या काळात भारतीय महिलांकडेही गोल करण्याच्या संधी येत होत्या. परंतू उतावळेपणा करत भारतीय महिलांनी त्या वाया घालवल्या. तिसऱ्या सत्राअखेरीस अर्जेंटिनाचा संघ सामन्यात २-१ अशा फरकाने आघाडीवर होता.
चौथ्या सत्रात भारतीय कर्णधार राणी रामपालने सूत्र आपल्या हाती घेत आक्रमणाची धार वाढवली. परंतू साईड पास आणि शॉर्ट पासवर नियंत्रण ठेवण्यात भारतीय महिला अपयशी ठरल्यामुळे अर्जेंटिनाचा गोलपोस्ट सुरक्षित राहिला. पासवर नियंत्रण नसल्याच्या कारणामुळे भारतीय महिलांनी अनेक संधी गमावल्या. भारतीय महिलांनी आपली आक्रमणाची धार कायम ठेवत सामना संपायला ९ मिनीटं बाकी असताना पेनल्टी कॉर्नर मिळवला. परंतू अर्जेंटिनाची अनुभवी गोलकिपर मारीये बेलेन सुचीने हा हल्ला परतवून लावला. यानंतर भारतीय महिलांकडे बॉलचा ताबा आला, परंतू त्यावर नियंत्रण न मिळवण्यात अपयश आल्यामुळे भारताचा गोल होऊ शकला नाही. सामना संपायला ३-४ मिनीटांचा अवधी बाकी असताना अर्जेंटिनाच्या खेळाडू बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवत वेळ वाया घालवायला लागल्या.
परंतू इथेही भारतीय महिला बॉलवरचा ताबा मिळवण्यात अपयशी ठरल्या. सामना संपायला २ मिनीटं बाकी असतानाही हातात आलेला बॉलचा ताबा भारतीय महिलांनी क्षुल्लक चुका करत गमावला. सामन्यात बरोबरी करण्यासाठी अखेरची संधी आलेली असतानाही भारतीय महिलांच्या खेळात कोणतीही गती जाणवली नाही. प्रत्युत्तरादाखल अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आघाडी असतानाही गोलच्या चांगल्या संधी निर्माण केल्या. परंतू भारतीय महिला अर्जेंटिनाचा बचाव भेदण्यात अपयशी ठरल्या. अखेरीस २-१ च्या फरकाने सामन्यात बाजी मारत अर्जेंटिनाच्या महिलांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
ADVERTISEMENT