अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने इंग्लंडवर १० विकेट राखून मात केली. अहमदाबादच्या टर्निंग ट्रॅकवर दोन दिवसांत सामना संपल्यामुळे इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांमध्ये टेस्ट मॅच कशी संपते या मुद्द्यावरुन अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआय व टीम इंडियावर टीका केली. अजुनही इंग्लंडचे माजी प्लेअर तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पराभवासाठी भारतीय संघाला दोष देत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारपासून सुरु होणारा चौथ्या टेस्ट मॅचमध्येही टर्निंग ट्रॅक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, चौथ्या टेस्ट मॅचसाठीही तिसऱ्या सामन्यातलीच खेळपट्टी वापरण्यात येणार आहे. तिसऱ्या टेस्ट मॅनंतर जसप्रीत बुमराहने खासगी कारण चौथ्या टेस्ट मॅचमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागेवर उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. याचसोबत वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर कुलदीप यादवलाही संधी मिळण्याबाबत टीम इंडियाचं मॅनेजमेंट विचार करु शकतं असं कळतंय.
दरम्यान तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये झालेल्या पराभवामुळे तिळपापड झालेल्या इंग्लंडच्या माजी प्लेअर्सचा राग अजुनही शांत झालेला दिसत नाहीये. टीम इंडिया आणि बीसीसीआयवर टीका करणाऱ्या इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनने पुन्हा एकदा मोटेराच्या पिचची खिल्ली उडवली आहे.
४ मार्चपासून अहमदाबादच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मायकल वॉनने त्याआधी भारतीय शेतकऱ्याचा नांगर घेऊन शेत नांगरतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत…चौथ्या टेस्ट मॅचसाठीची तयारी जोरात सुरु असल्याचं म्हटलंय.
ADVERTISEMENT