यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने U-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडवर मात करुन विजेतेपद मिळवलं आहे. इंग्लंडचा ४ विकेटने पराभव करत भारताने U-19 विश्वचषकाच्या इतिहासातलं आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं आहे. या ऐतिहासीक कामगिरीनंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
ADVERTISEMENT
कॅरेबिअन बेटांवर धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी बीसीसीआयनेही रोख रकमेचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला २५ लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली.
अंतिम सामन्यात राज बावाने केलेली अष्टपैलू कामगिरी आणि शेख रशिद आणि निशांत सिंधूच्या निर्णयाक अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सामन्यात विजय मिळवला. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाहीये. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी, आयर्लंडवर १७४ धावांनी, युगांडावर ३२६ धावांनी, बांगलादेशवर ५ धावांनी आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवला होता. हीच विजयी परंपरा भारताच्या युवा खेळाडूंनी अंतिम सामन्यातही कायम राखली.
या कामगिरीसह युवा कर्णधार यश धुलला मोहम्मद कैफ, उन्मुक्त चंद, विराट कोहली, पृथ्वी शॉ या विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधारांच्या मानाच्या यादीत स्थान मिळालं आहे.
ADVERTISEMENT