डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने श्रीलंकाविरुद्ध मोहाली कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान जाडेजाने आपलं शतक पूर्ण करत भारताला ५७४ धावांचा टप्पा गाठून दिला. दुसऱ्या दिवशी रविंद्र जाडेजाला आश्विनने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऋषभ पंतच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ३५७ धावांपर्यंत मजल मारली होती.
ADVERTISEMENT
दुसऱ्या दिवशी जाडेजा आणि आश्विन जोडीने पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. मैदानावर जम बसलेल्या दोन्ही खेळाडूंनी काही सुंदर फटके खेळीत महत्वपूर्ण भागीदारी रचली. पहिलं सत्र संपायच्या आधी लकमलने आश्विनला माघारी धाडत भारताला धक्का दिला. यानंतर रविंद्र जाडेजाने जयंत यादवच्या साथीने आपलं कसोटी कारकिर्दीतलं दुसरं शतक साजरं केलं.
Ind vs SL : शतकी खेळीत विराट कोहलीचा विक्रम, परंतू शतकाची प्रतीक्षा अजुनही कायम
जयंत यादव विश्वा फर्नांडोच्या बॉलिंगवर माघारी परतल्यानंतर जाडेजाने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. मोहम्मद शमीच्या साथीने त्याने पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडत संघाला ५०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. यादरम्यान जाडेजाने आपलं दीड शतकही पूर्ण केलं. जाडेजाला आपलं द्विशतक झळकावण्याची संधी असतानाच भारताने आपला पहिला डाव घोषित केला. ज्यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली. रविंद्र जाडेजाने २२८ बॉलमध्ये १७ चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद १७५ धावा केल्या.
त्याला दुसऱ्या बाजूने शमीने २० धावा काढत चांगली साथ दिली. पहिल्या डावात श्रीलंकेकडून लकमल, फर्नांडो आणि एम्बुलदेनियाने प्रत्येकी २-२ तर कुमारा आणि डी-सिल्वा यांनी १-१ विकेट घेतली.
शंभरावी कसोटी आणि विराट-सचिनची तुलना, कोहली मोडू शकेल का तेंडुलकरचा रेकॉर्ड?
ADVERTISEMENT