Crime News: बापच निघाला हैवान पोटच्या दोन चिमुकल्या लेकरांना थेट...
धुळ्यातील शिरपूर येथे एका व्यक्तीने पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या दोन्ही मुलांना तापी नदीत फेकून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

विशाल ठाकूर, धुळे: शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदी पात्रात गावातील दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. घरगुती वादातून वडिलांनी बहिण आणि भावाला नदीत फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या संदर्भात शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावाच्या हद्दीत भुईकोट किल्ल्याजवळ अमरधाम आहे. या अमरधामसमोर तापी नदी पात्र असून या नदी पात्रात काल (4 फेब्रुवारी) सायंकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले.
हे ही वाचा>> बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण
या घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी नदी परिसरात जमा झाले. गावातील काही तरुणांनी पाण्यात उतरून दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जेथे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोन्ही मुलांना तपासून मृत घोषित केले.
कार्तिक सुनील कोळी (वय 5 वर्ष) आणि चिमू सुनील कोळी (वय 3 वर्ष) रा. थाळनेर अशी दोघांची नावे आहेत. थाळनेर कुंभारटेक येथील सुनील नारायण कोळी यांची ही दोन्ही मुलं आहेत.
हे ही वाचा>> Kharghar Road Rage : गाडीचा धक्का लागला म्हणून वाद झाला, डोक्यात हेल्मेट मारल्यानं एकाचा मृत्यू
बापानेच केली पोरांची हत्या
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच थाळनेर गावातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या भयंकर घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणाव निर्माण झाल्याने थाळनेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली.
यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि काही तासातच या घटनेचा उलगडा केला. पत्नी सोबतच्या घरगुती वादातून सुनील कोळी यांनेच आपल्या पोटच्या मुलाला व मुलीला थेट तापी नदीत फेकून दिल्याचे उघड झाले. ज्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले. आता या प्रकरणी अधिकचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील हे करत आहेत.