टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून, कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधला, कंपनीतला व्हायरल व्हिडीओ काय?
उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांच्या तक्रारीच्या आधारे राज्य मानवी हक्क आयोगाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

टार्गेट पूर्ण न झाल्यानं कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा छळ

कर्मचाऱ्यांचा गळ्यात पट्टा बांधलेला व्हिडीओ समोर

मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, घटना काय?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. एका खाजगी मार्केटिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांचा अमानवी पद्धतीनं छळ केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. टार्गेट पूर्ण न करता आल्यानं कर्मचाऱ्यांना साखळीने कुत्र्यासारखं बांधून गुडघ्यावर चालायला सांगितलं. हा व्हिडिओ कंपनीच्या माजी व्यवस्थापकानं त्याच्या फोनवर शूट केला आहे. केरळमधील या व्हिडीओवरुन सध्या संताप व्यक्त केला जातोय.
हे ही वाचा >>हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
माजी व्यवस्थापकाचा कंपनीच्या मालकाशी वाद होता. त्यामुळेच त्यानं नवीन प्रशिक्षणार्थींचा हा व्हिडीओ शूट केला. हा एक प्रशिक्षणाचा भाग असल्याचंही त्याने म्हटलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गळ्यात पट्टा बांधून कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर चालताना दिसतोय. हा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वी शूट करण्यात आला होता. आता तो व्यवस्थापक कंपनी सोडून गेला आहे.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून कपडे काढण्यास भाग पाडण्यात आलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळच्या कामगार विभागाने चौकशीचे आदेश दिले असून, या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असून, त्यांनी या घटनेसाठी माजी व्यवस्थापकाला जबाबदार धरलं आहे.
काही लोकांनी एका स्थानिक टीव्ही चॅनेलला सांगितलं की, जे लोक टार्गेट पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना व्यवस्थापनाकडून अशी शिक्षा दिली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी कलूर येथे असून, ही घटना पेरुंबवूरमध्ये घडली आहे. तसंच, यात एक ट्विस्ट आला. व्हिडिओमध्ये कथितपणे छळ आणि छळ होताना दिसलेल्या एका व्यक्तीने नंतर मीडियाला सांगितलं की, कंपनीमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचा छळ झाला नाही.
हे ही वाचा >>स्कॉर्पिओमधून आले, महिलेला उचलून नेलं... पिंपरीतल्या अपहरणाचा काही तासात उलगडा, मोठा ट्वीस्ट
त्या व्यक्तीने दावा केला, 'मी अजूनही फर्ममध्ये काम करत आहे. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असून, त्यावेळी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने तो जबरदस्तीने बनवला होता. नंतर व्यवस्थापनाने त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं आणि तो आता कंपनीच्या मालकाची बदनामी करण्यासाठी या व्हिडिओचा वापर करतोय.
पोलिस आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी हेच निवेदन दिलं. राज्याचे कामगार मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी हा व्हिडीओ धक्कादायक असल्याचं म्हटलंय. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 'मी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.' उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांच्या तक्रारीच्या आधारे राज्य मानवी हक्क आयोगाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.