राहुल सोलापूरकरची दिलगिरी पण म्हणाला, 'लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र...'
शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याने आता त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. पाहा नेमकं काय म्हणाला.
ADVERTISEMENT

पुणे: 'लाच शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता. लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा. पण लाच हा शब्द वापरल्याबद्दल मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.' असं म्हणत अभिनेता राहुल सोलापूरकर याने शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे.
राहुल सोलापूरकरने शिवाजी महाराजांबाबत जे विधान केलं होतं ते समोर आल्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका सुरू झाली. ज्यानंतर रात्री उशिरा फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून राहुल सोलापूरकरने या सगळ्या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.
आधी वादग्रस्त विधान आणि नंतर दिलगिरी..
'मी अभिनेता राहुल सोलापूरकर.. साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वी रिमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्ट मी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका याविषयी काही बोललो.'
'बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रं, फारसी-उर्दू अशा ग्रंथांमधील आणि औरंगजेबाच्या माणसांच्या जवळच्या काही गोष्टी या ज्या वाचायला, अभ्यासाला मिळाल्या होत्या त्यातील काही गोष्टी सांगून मी बोललो. हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्नं दिली, कोणाला पैसे दिले.. काय-काय केलं.. हे सगळं याचं एकत्रिकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या.. कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथून स्वत:ची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला.'
हे ही वाचा>> 'शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यावरून सुटलेले', राहुल सोलापूरकरचं 'ते' वादग्रस्त विधान जसंच्या तसं..
'साम-दाम-दंड-भेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय हे फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती. अत्यंत नेकीने सगळा इतिहास अभ्यासून.'
'जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय, पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची अनेक व्याख्यानं जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे.'
'त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही. त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कोणी तरी त्या पॉडकास्टमधील दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला. असं म्हणून त्यावरून संपूर्ण गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे. माझं असं प्रामाणिक सांगणं आहे की, यातील माझा कुठलाही हेतू महाराजांचा नखभर सुद्धा अपमान करण्याचा नाही.'
हे ही वाचा>> Shivaji Maharaj: 'कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करुन...', उदयनराजे संतापले
'मी इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय-काय गोष्टी भरल्या जातात. हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त, शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो.'
'छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे. गडकिल्ल्यांवरून वाढलेलो आहे. रायगडावरची डॉक्यूमेंट्री त्यासाठीच मी केलेली होती की, आपण कसं पंढरपूरचा वारकरी असतो त्याच भावनेने छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालं पाहिजे. महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणारा एक शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातील.'
'त्यामुळे ज्या कोणाला वाटत असेल की, मी काही बोलल्याने भावना दुखावल्या. शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर असं माझ्याकडून स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा.'
'माझं प्रामाणिक मत आहे की, यावरून उगाचच काही महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही म्हणत असाल तर शिवाजी या विषयावर इथून पुढे बोलणं देखील बंद करेन.'
'मी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता तो विषय मांडताना फक्त मूळ इतिहास आणि रंजकता असा विषय घेऊन त्या विषयी बोललो होतो. त्या विषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी उत्तम लिहलं आहे. अनेक पुरावे उपलब्ध आहेत फारसी गोष्टींपासून, राजस्थानच्या बिकानेरच्या राजवाड्यात. जिथे औरंगजेबाचा मूळ जो करार मिर्झाराजे जयसिंगांसोबत झाला तो उपलब्ध आहे.'
'माझं एवढंच म्हणणं आहे की, उगाचच एखाद्या शब्दावरून एवढा किस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा. पुन्हा एकदा सांगतो... लाच हा शब्द वापरल्यामुळे जर कदाचित आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगीर आहे.'
'हा शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता. लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा त्याचे पुरावे पण आहेत. अगदी अलीकुली खानपासून सगळ्याचे.. पण मी त्या विषयात आता मात्र पडणार नाही. लाच हा शब्द वापरल्याबद्दल मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.'
'शिवरायांपुढे मी हजार वेळा नतमस्तक आहे. कदाचित आपल्या भावना दुखावल्या असतील तर या माझ्या खुलाशामुळे दूर होतील अशी अपेक्षा.' असं म्हणत राहुल सोलापूरकरने त्याने जे शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.
राहुल सोलापूरकरचं 'ते' वादग्रस्त विधान काय?
'शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. त्यासाठी किती हुंडा वटवलाय ते सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलीए महाराजांनी. मोहसीन खान की मोमीन खान नाव आहे त्याचं बहुतेक... त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवान्याने घेऊन सगळे बाहेर पडले आहेत.'
'स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रुपात सांगताना मग ते लोकांना रंजक करून सांगावं लागतं. ती रंजकता आली की, इतिहासाला थोडासा छेद जातो.' असं विधान राहुल सोलापूरकरने एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलं होतं.