Jalna : पत्र्याच्या आडोशाखाली झोपलेल्या मजूरांवर रात्री वाळूचा ट्रक रिकामा केला, 5 मजूरांचा दबून मृत्यू
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात ही घटना घडलीय. जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुल बांधण्याचं काम चालू आहे. तिथेच ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालन्यात धक्कादायक घटना, 5 मजुरांचा मृत्यू

कामगार झोपेत असतानाच टिप्पर चालकानं टाकली वाळू

वाळूच्या ओझ्याने पत्र्याखाली दबले मजूर
जालन्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. पुलाचं काम करणारे कामगार पत्र्याखाली झोपलेले असतानाच टिप्पर चालकानं वाळू टाकून दिल्यानं 5 कामागारांचा दबून मृत्यू झालाय. वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून झोपेत असलेले 5 कामगार जागीच ठार झालेत. जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रस्त्यावर ही घटना घडली आहे. पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्यानं झोपलेल्या 5 मजुरांना काहीच करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचा तिथेच मृत्यू झाला.
हे ही वाचा >>Suresh Dhas : "मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार की...", धनंजय देशमुखांच्या भेटीनंतर धस काय म्हणाले?
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात ही घटना घडलीय. जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुल बांधण्याचं काम चालू आहे. या कामासाठी सिल्लोडमधील काही मजूर आले आहेत. काल दिवसभर पुलाचं काम करून रात्री 5 कामगारांनी विसावा घेण्यासाठी पासोडी-चांडोळ रस्त्याजवळ पत्र्याचं शेड बांधलं.
रात्री पत्र्याच्या शेडखाली 5 कामगार झोपले असतानाच रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून आलेल्या टीप्पर चालकाने उपसा केलेली वाळू पत्र्याच्या शेडवर खाली केली. यावेळी वाळूच्या वजनाने पत्र्याचे शेड तुटून त्या खाली झोपलेल्या कामगारांच्या अंगावर कोसळलं. यावेळी झोपेत असलेल्या 5 कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा >>Suresh Dhas मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुख म्हणाले पोलिसांनी हात झटकले, आरोपी त्यांचा मित्र...
मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय 40 रा. गोळेगाव) भूषण गणेश धनवई (वय 16 रा. गोळेगाव) सुनील समाधान सपकाळ (वय 20 रा. पद्मावती) यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढलं. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.