Akola : अकोल्यात उर्दू शाळांमध्ये धक्कादायक प्रकार! "संचालकच घेतो अर्धे पगार, न दिल्यास लैंगिक छळ"
शाळेचे संचालक सय्यद कमरुद्दीन यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि ते राजकीय षड्यंत्र असल्याचं म्हटलं. "मी काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होतो, म्हणून माझ्या शाळांना लक्ष्य केलं जातंय."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अकोल्यातील धक्काकायक प्रकार

शिक्षिकांवरच होतोय लैंगिक अत्याचार?

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे कारवाईचे आदेश
Akola : अकोला जिल्ह्यात उर्दू शाळांमधील भ्रष्टाचार आणि शोषणाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी जिल्ह्यातील सरकारी अनुदानित उर्दू शाळांची पाहणी केली, ज्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. विशेषतः पातूर तहसीलच्या 'अलहाज सलीम झकेरिया उर्दू प्राथमिक शाळेतील' महिला शिक्षिकांनी शाळा संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये लैंगिक शोषण, मानसिक छळ, मारहाण आणि पगार कपात केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
महिला शिक्षकांवर गंभीर आरोप
तीन शिक्षिकांनी आरोप केले आहेत की, शाळेचे संचालक सय्यद कमरुद्दीन यांनी त्यांचा शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ केला. तसंच पगाराच्या 50% रक्कम जबरदस्तीने आमच्याकडून वसूल केली जाते. जर कुणी विरोध केला, तर त्यांना मारहाण केली जात होती आणि धमक्या दिल्या जात होत्या. महिला शिक्षिकांना अश्लील शब्दात टीका आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं असे गंभीर आरोप केले.
हे ही वाचा >> वडिलांना न सांगता चार्टर्ड फ्लाइटने बँकॉकला निघालेला तानाजी सावंतांचा मुलगा आहे तरी कोण?
एक शिक्षिका म्हणाल्या, संचालक मानसिक छळ करतो. तो अर्धा पगार मागतो आणि विरोध केल्यास मारहाण करतो. तर दुसऱ्या शिक्षिकेने सांगितलं, महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत. आम्हाला अश्लील कमेंट्स आणि धमक्यांना तोंड द्यावे लागतं. तर आणखी एका शिक्षिकेनं सांगितलं की, हा सर्व प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. पण आता आम्हाला न्याय हवा आहे.
अल्पसंख्याक आयोगाची कारवाई
हे प्रकरण गांभीर्याने घेत, प्यारे खान यांनी अकोला पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभरातील उर्दू शाळांमध्ये भ्रष्टाचार आणि शोषणाविरुद्ध मोठी चौकशी मोहीम राबवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्यारे खान म्हणाले, उर्दू शाळांच्या नावाखाली सरकारची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली जात आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
शाळेचे संचालक काय म्हणाले?
शाळेचे संचालक सय्यद कमरुद्दीन यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि ते राजकीय षड्यंत्र असल्याचं म्हटलं. "मी काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होतो, म्हणून माझ्या शाळांना लक्ष्य केलं जातंय. माझ्या शाळांबद्दल खोटे आरोप केले जात आहेत. हे सर्व माझ्याविरुद्ध राजकीय षड्यंत्र आहे" असं संचालकांनी म्हटलं आहे. दरम्यान, अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनंतर अकोला पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलीस अधीक्षक बच्चन सिंह म्हणाले, आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई करू.
हे ही वाचा >> "शरद पवार साहेबांची राजकारणातील गुगली...", महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानंतर DCM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!
दरम्यान, सरकारी अनुदानाचा गैरवापर करून राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा प्यारे खान यांनी केला आहे. उर्दू शाळांच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची फसवणूक सुरू आहे, जी उघडकीस आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.