Mumbai : बंगले मिळूनही मंत्री आमदार निवासच्या खोल्या सोडेनात, नव्या आमदारांमध्ये खोल्यांसाठी वाद?
एकीकडे, नवनिर्वाचित आमदारांना त्यांच्या खोल्या न मिळाल्यानं ते नाराज आहेत, तर दुसरीकडे, मंत्र्यांच्या कार्यालयातून अशा तक्रारी येत आहेत की त्यांना वाटप केलेली घरं चांगल्या अवस्थेत नाहीत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सरकार स्थापन होऊन महिने उलटले, आमदारांना खोल्या मिळेना

सराकारी बंगले मिळूनही मंत्री जुन्या खोल्या का सोडेनात?

खोली मिळवण्यासाठी आमदारांमध्ये वाद?
राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटूनही, अनेक नवनिर्वाचित आमदारांना मुंबईतील आमदार निवासमध्ये राहण्यासाठी जागा मिळालेली नाही. याचं कारण म्हणजे सध्याच्या सरकारमधील अनेक माजी आमदार आणि मंत्र्यांनी आमदार निवास रिकामे करण्यास नकार दिलेला आहे. विधानसभा सचिवालयाने त्यांना नोटिसाही पाठवल्या आहेत.
आमदार निवासमधील खोल्या न सोडणाऱ्या नेत्यांमध्ये अनेक मोठी नावं आहेत. ज्यामध्ये गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री), संजय सावकर (वस्त्रोद्योग मंत्री), मकरंद पाटील (मदत आणि पुनर्वसन मंत्री), बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री), पंकज भोयर (गृह राज्यमंत्री - ग्रामीण) आणि योगेश कदम (गृह राज्यमंत्री - शहरी) या मंत्र्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा >>Sambhajinagar : शिवजयंतीमध्ये गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणारा 21 वर्षीय तरूण पोलिसांच्या ताब्यात
एकीकडे, नवनिर्वाचित आमदारांना त्यांच्या खोल्या न मिळाल्यानं ते नाराज आहेत, तर दुसरीकडे, मंत्र्यांच्या कार्यालयातून अशा तक्रारी येत आहेत की त्यांना वाटप केलेली घरं चांगल्या अवस्थेत नाहीत. तिथे दुरुस्तीची कामं अजूनही सुरू आहेत. त्यामुळे ते आमदार निवास रिकामा करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
घरांसाठी आमदारांमध्ये वाद?
अनेक आमदार निवासस्थानाचा प्रश्न घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर काही ठिकाणी एकाच खोलीसाठी दोन किंवा अधिक आमदारांमध्ये वाद होतायत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी यावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हे ही वाचा >> Vijay Wadettiwar Tweet : "शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...", विजय वडेट्टीवारांचा घणाघात
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. सुमारे दोन आठवडे हे अधिवेशन चालेल. अशा परिस्थितीत, आमदारांची कामं सुरळीत चालावीत म्हणून सरकार या महत्त्वाच्या समस्येचं निराकरण कसं करणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.