Fact Check: नितेश राणे म्हणाले शिवरायांसोबत मुस्लिम नव्हतेच, आता ‘ही’ यादीच आली समोर.. काय आहे सत्य?
मंत्री नितेश राणे यांनी अनेकदा मुस्लिम धर्मींयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत वाद उभे केले आहेत. अशातच त्यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य करत शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते असं म्हणत एक वेगळाच इतिहास मांडल्याचं दिसलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते : नितेश राणे

स्वराज्याची लढाई हे इस्लाविरोधात होती : नितेश राणे

राणेंच्या वक्तव्यानं वाद, मुनगंटीवार, अजित पवार काय म्हणाले?
Nitesh Rane : राज्यात गेल्या वर्षभरापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले नितेश राणे हे अनेकदा वादाचं कारण ठरलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार आल्यानंतर नितेश राणे यांना मंत्रीपदही मिळालं, मात्र वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबली नाही. मुस्लिम धर्मीयांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंनी आता काही वक्तव्य करुन,राणेंनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू ठेवली आहे. शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असं म्हणत नितेश राणे यांनी आपला एक वेगळा इतिहास मांडल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्यावर आता वेगवेगळ्या स्तरांमधून टीका होत असून, शालेय पुस्तकांचा संदर्भ देत अनेकांनी हा दावा खोडून काढला आहे. (Nitesh Rane Statement Controversy)
नितेश राणे काय म्हणाले होते?
"आमच्यातले काही टाळके सांगतात, शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते, हे उगाच टेपरेकॉर्डर चालवतात, स्वराज्याची लढाई हे इस्लाविरोधात होती, हिंदू-मुस्लिम लढाई होती, या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लामसमोर झुकू दिला नाही, हा इतिहास आहे" असं नितेश राणे म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं.
हे ही वाचा >> अर्धनग्न करत मारहाण, चटके दिले... सोलापुरात 28 वर्षीय तरूणाला निघृणपणे संपवल
इतिहासाच्या पुस्तकात काय?
महाराष्ट्र शासनाच्या चौथीच्या पुस्तकामध्ये असलेल्या मजकुरानुसार शिवरायांच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये सिद्दी हिलाल होते. तसंच त्यांचे अंगरक्षक आणि अनेक जबाबदार पदांवर मुस्लिम मावळे होते. तसंच हिंदवी स्वराज्य म्हणजे, हिंदुस्तानात राहणारे असा स्पष्ट उल्लेख चौथीच्या पुस्तकात आहे.
हे ही वाचा >>Crime : एक महिन्याच्या बाळाचं अपहरण, हजारो रिक्षा चालकांची चौकशी करत पोलिसांनी बाळ विकण्यापूर्वीच...
स्वराज्यातील प्रमुख पदांवरील मुस्लिम मावळे
सिद्दी हिलाल : घोडदळातील सेनापती
सिद्दी वाहवाह : घोडदळातील सरदार
सिद्दी इब्राहिम : शिवाजी महाराजांचा अंगरक्षक
नूरखान बेग : स्वराज्याचा पहिला सरनोबत
मदारी मेहतर : महाराजांचा विश्वासू सेवक
काझी हैदर : महाराजांचा वकिल
इब्राहिमखान : आरमारातील अधिकारी
दौलतखान : आरमार प्रमुख
इब्राहिमखान : तोफखान्याचा प्रमुख
राणेंना मुनगंटीवारांचा टोला, अजितदादांचा सल्ला
भाजपचेच नेते आणि नितेश राणे यांचे सहकारी सुधीर मुनगंटीवार यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चांगलाच टोला मारला. राणेंनी वाचलेलं पुस्तक मी वाचलं नसेल, मला माहिती नाही, मी तेवढं एक पुस्तक वाचलं नसेल, शिवरायांसोबत एकही मुस्लिम नव्हता असं म्हणणं योग्य नाही, त्यांच्यासोबत लढणारे लोक देशभक्त मुस्लिमच होते असं मुनगंटीवार म्हणाले. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नितेश राणेंना सल्ला दिलाय. शिवरायांचा दारूगोळा कोण सांभाळत होतं? असे कितीतरी उदाहरणं देता येतील. कायदा व सुव्यस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं अजित पवार म्हणाले. तर अमोल मिटकरी यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये मुस्लिम सरकार, अधिकाऱ्यांची यादीच शेअर केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास हा अठरापगड जातीतील, वेगवेगळ्या धर्मातील सहकाऱ्यांच्या साथीनं घडलेला इतिहास असून, त्यांचा लढा हा जाती-धर्माच्या पलीकडे होता हे अनेक प्रसंगांमधून स्पष्ट झालं आहे. वर दिलेल्या यादीव्यतिरिक्तही अनेक मुस्लिम धर्मीय स्वराज्याच्या कामी आलेले उल्लेख इतिहासात आहेत. अनेक ऐतिहासिक पुराव्यांमध्ये देखील शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम अधिकारी आणि सैनिक असल्याचे दाखले हे पाहायला मिळतात. त्यामुळे नितेश राणेंच्या विधानावरुन आणखी काय काय प्रतिक्रिया समोर येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे.