मुक्ताफळं उधळणाऱ्या माणिकरावांना अजितदादांनी झापलं, राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate News : कर्जमाफीच्या माध्यमातून दिलेले पैसे शेतकरी सारखपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरतात, असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माणिकराव कोकाटेे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

अजित पवार यांनी कोकाटेंना सुनावलं?
Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहे. सातत्याने वादग्रस्त विधानं केल्यानं आता त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादांनी चांगलंच फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे.
जबाबदार मंत्री असतानाही पक्षाला अडचणीत आणणारी विधानं करणं आणि जनता दरबारासाठी पक्ष कार्यालयात हजर न राहणं, यावरून अजितदादांनी भरबैठकीत कोकाटेंना झापल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. मंगळवारी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोकाटेंना अजितदादांच्या नाराजीचा सामना करावा लागला.
हे ही वाचा >> संतापजनक! तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा ड्रग्ज प्रकरणात हात, 35 जणांवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री व महत्त्वाचे नेते देवगिरी बंगल्यावर पोहचले होते. परंतु अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाल्यानंतरही मंत्री माणिकराव कोकाटे तिथे पोहचलेले नव्हते. अर्ध्या तासानंतर कोकाटे बैठकस्थळी दाखल झाले. यावेळी अजितदादांनी थेट कोकाटेंना फैलावर घेतलं. वादग्रस्त विधानं, बेशिस्त वागणूक, बैठकांना दांडी मारणं आणि उशीरा पोहचणं यावरून कोकाटेंना अजितदादांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं. त्यामुळं आता राष्ट्रवादीच्या बैठकीत घडलेल्या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
हे ही वाचा >> "2029 ला देशाच्या पंतप्रधानपदी...", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
कर्जमाफीच्या माध्यमातून दिलेले पैसे शेतकरी सारखपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरतात, असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, एक रुपया भिकारीही घेत नाही, अशा प्रकारचं बेजबाबदार विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यामुळं आता राष्ट्रवादीचं पक्षनेतृत्व आणि अजितदादांनी बैठकीत सर्वांसमोर कानउघाडणी केल्यानंतर कोकाटेंचं वादग्रस्त विधानं थांबणार का? यावरून चर्चा सुरू झाल्यात.