मुख्यमंत्रीपदासाठी रावसाहेब दानवेंची अजित पवारांना खुलेआम मोठी ऑफर!
अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी बोलताना एक जाहीर ऑफर दिली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री पदावर 2024 कशाला आता म्हणाला तर आताही दावा करण्याची तयारी आहे. असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (21 एप्रिल) पुण्यात (Pune) सकाळ वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात केलं. अजित पवार यांच्या याच विधानामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. असं असताना आता भाजपचे (BJP) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी मात्र, अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री होण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (raosaheb danves open big offer to ajit pawar for the post of chief minister)
‘अजित पवार बहुमताच्या बाजूला आले तर मुख्यमंत्री..’
अजित पवार हे आजही मुख्यमंत्री होऊ शकतात. असं विधान करत रावसाहेब दानवे यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.
‘अजित पवारांचा मुख्यमंत्रिपदासाठीच दावा आहे.. आज नाही तर ज्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले त्या वेळेस काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीलाच जास्त जागा मिळाल्या होत्या. त्याही वेळेस अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. राजकारणातील या घटना आहेत म्हणून मी तुम्हाला घटना सांगितली.’
‘त्यामुळे दावा करणं वेगळी गोष्ट आहे बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे. जर बहुमताच्या बाजूला ते आले किंवा बहुमत कदाचित त्यांना भविष्यात मिळालं 10-20 वर्षांने तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. माझा काही त्यांना विरोध नाही. चांगले कार्यकर्ते आहेत.. धडाडीचे कार्यकर्ते आहेत.’
हे ही वाचा>> महाराष्ट्र भूषण : सरकार की धर्माधिकारी, कार्यक्रमाची वेळ कुणी ठरवली?
‘ते जे-जे वक्तव्य करतात त्याच्याकडे या राज्याचं सध्या लक्ष लागून राहिलं आहे.’ असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार हे पुन्हा भाजपसोबत जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी नेमकं काय केलंय विधान?
राष्ट्रवादी काँग्रेस 2024 मध्ये कशाला आताच मुख्यमंत्री पदावर दावा करु शकते, असं मोठं विधान विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं होतं.
1999 पासून राष्ट्रवादीने सहा उपमुख्यमंत्री दिले. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचे आकर्षण का आहे? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ‘2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. काँग्रेसपेक्षा आमच्या जागा 2 अधिक होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याची काँग्रेसच्या नेत्यांचीही मानसिकता होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते.’
हे ही वाचा>> अजित पवारांना मुख्यमंत्रिपदानं किती वेळा हुलकावणी दिली आहे?
‘पण त्यावेळी दिल्लीत नेमकं काय घडलं? याबाबत मला माहित नाही. मात्र पक्षाच्या शिस्तेसाठी वरिष्ठांचा आदेश पाळावा लागला आणि आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतरच्या काळात आम्ही कायमच दोन नंबरच्या स्थानावर राहिलो. काँग्रेसच्या जास्त जागा आल्या आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिलं आणि उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे राहिले.’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा>> सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचीच केली कोंडी; पत्रात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख
यापुढे आता 2024 राष्ट्रवादी हा मुख्यमंत्रीपदावर दावा करणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘2024 कशाला, आता म्हटलं तरी ठेवायची तयारी आहे.’
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवार यांच्याबाबत अनेकांनी त्यांच्या राजकीय भूमिकांबाबत संशय व्यक्त केला आहे. अनेकदा ते पक्षाला अडचणीत आणणारी अशी विधानंही करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशावेळी आता रावसाहेब दानवेंसारख्या नेत्याने त्यांना थेट ऑफर देणं यामुळे चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.