Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!
Shiv Sena UBT-MNS Alliance: मनसेसोबत युती करण्यासाठी आपण तयार आहोत. त्यासाठी किरकोळ भांडणं मिटवू असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आतापर्यंत सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करण्यास, एकत्र येण्यास आता तयार झाले आहेत. ज्याबाबत त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे विधान केलं आहे.
शिवसेना कामगार सेनेचा जो मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्याच मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी भांडणं मिटवून टाकली चला.. किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे, मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आता थेट राज ठाकरेंच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकली आहेत.
राज ठाकरेंसोबत युती करायला तयार, पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले
'मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण, तुम्ही बाहेर गेल्यावर आणि बातम्या वाचल्यावर कळेल किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे ते. किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे. मी सुद्धा सर्व मराठी माणसांना महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे.'
'पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसेभाला सांगत होतो की, महाराष्ट्रातन गुजरातमध्ये कारभार,उद्योग घेऊन जातायत, तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडं बसलं नसतं.'
'महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं. राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार बसलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्र हिताच्या जो कोणी आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही, त्याचं आगतस्वागत मी करणार नाही, त्य़ाच्याबरोबर पंगतीला मी बसणार नाही, हे पहिलं ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा.'
'बाकी आमच्यातली भांडणं, जी काही भांडणं माझ्याकडून नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला... पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित.'
'मग त्यावेळी सगळ्या मराठी माणासांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं की शिवसेनासोबत म्हणजेच माझ्याबरोबर. एसंशिं नाही... गद्दार सेना नाही. पण ठरवा, कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्त्वाचं हित होणार आहे. माझ्याबरोबर की भाजपबरोबर?'
'मग काय द्यायचा असेल तो पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा तो अगदी बिनशर्त करा. माझी काही हरकत नाही.'
'महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकिच्यांना या चोरांना, पाठिंबा किंवा कळत-नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची.' अशी अट ठेवत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे.
'आमच्यातील भांडणं किरकोळ आहेत...', राज ठाकरे नेमकं म्हणालेले?
नुकतंच ज्येष्ठ दिग्दर्शक आणि सिने निर्माते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. ज्यामध्ये त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? असा सवाल विचारला होता.
महेश मांजरेकरांच्या याच प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणालेले की, 'प्रश्न असा आहे की, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये मला काही फार कठीण गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही.'
'परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा फक्त एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही. माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही. मला असं वाटतं की, आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी.'
'मी महाराष्ट्राचा स्वार्थ पाहतोच आहे.माझं म्हणणं आहे की, सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमधील सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.' असं राज ठाकरे म्हणालेले
राज ठाकरेंनी दिलेल्या याच उत्तराचा संदर्भ घेत आज (19 एप्रिल) उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेतून मनसेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अत्यंत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यानंतर अनेकांनी शिवसेना (UBT) पक्षाच्या अस्तित्वाबाबतच सवाल उपस्थित केले. तर दुसरीकडे याच निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला स्वत:चं खातंही उघडता आलं नाही.
अशावेळी आता दोन्ही भावांनी आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर मनसे आणि शिवसेना (UBT) पक्षाची युती झाल्यास राज्यातील संपूर्ण राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे-राज ठाकरेंची भेट आणि युतीची चर्चा
साधारण तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती होणार का? अशी जोरदार चर्चा रंगली होती.
पण या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलताना म्हणालेले की, 'ही एक अनौपचारिक भेट होती. राज ठाकरेंनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आलो होतो. इथे युतीची चर्चा झाली नव्हती.' त्यामुळे त्यांनी युतीच्या चर्चेचं वृत्त फेटाळून लावलं होतं.
दुसरीकडे, आता उद्धव ठाकरेंनी मात्र उघडपणे युतीबाबत भाष्य केलं आहे. ज्याचा आता राज्याचा राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.