पिंपरी-चिंचवड : पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ होतेय. नुकत्याच एका घटनेत सिंचन विभागातून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर मार्केटच्या नावाखाली 2.52 कोटी रुपयांची फसवणूक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 24 मार्च रोजी उघडकीस आली. पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. आरोपीने सोशल मीडियावर संपर्क साधून भरगोस परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं, त्यातूनच फसवणूक झाली असं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणात मोठे कनेक्शन समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
पोलिस तपासात या फसवणुकीचे पैसे बीड जिल्ह्यातील एका बँक खात्यात जमा झाल्याचे आढळले. पोलिसांनी खातेधारकाला ताब्यात घेतलं. त्याने आपले खाते गेमिंगसाठी बाळासाहेब सखाराम चौरे (वय 32) याला दिल्याची कबुली दिली. त्यानंतर चौरे याला पोलिसांनी 26 मार्च रोजी बीडमधील केजच्या जीवाची वाडीमधून अटक केली.
हे ही वाचा >> "100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय
तपासातून समोर आलं की, चौरे हा पाकिस्तानी नागरिक आणि दुबईतील गणेश काळे यांच्या सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग होता. चौरे मराठवाड्यातल्या लोकांच्या बँक खात्याचे डिटेल्स या टोळीला पुरवायचा. काळे आणि चौरे यांची भेट मल्टीलेव्हल मार्केटिंग (MLM) कंपनीत काम करताना झाली होती. काळे आणि पाकिस्तानी नागरिकाने चौरे याला कमिशनच्या बदल्यात खात्यांची माहिती पुरवण्यास सांगितलं होतं. आतापर्यंत चौरे याने मराठवाड्यातून 15-20 मुळ खाती पुरवली असून, त्याला 2.5 लाख रुपये कमिशन मिळालं.
हे ही वाचा >> अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीने स्वत:ला कसं संपवलं? कशी होती 'चीड आणणारी' क्राईम हिस्ट्री?
पिंपरी-चिंचवड पोलिस सायबर सेलचे सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी सांगितले, “चौरे हा 'अशिक्षित व्यक्ती, मजूर आणि चालक' यांच्या कागदपत्रांचा वापर करून बँक खाती उघडत असे. तो दुबई, नेपाळ आणि इतर ठिकाणांहून चालणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात होता.” पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
