Mangeshkar Hospital: कोण होत्या तनिषा भिसे? पहिलंच बाळंतपण, दोन चिमुकलींना जन्म दिला अन्...

पहिल्यांदा मातृत्वाची स्वप्ने पाहिलेल्या तनिषा भिसे यांना हा आनंद काही क्षणही घेता आला नाही. पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलच्या आडमुठ्या धोरणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. जाणून घ्या कोण होत्या तनिषा भिसे.

 कोण होत्या तनिषा भिसे?

कोण होत्या तनिषा भिसे?

मुंबई तक

• 05:01 PM • 04 Apr 2025

follow google news

पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेच्या मृत्यूने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. या महिलेचे नाव तनिषा (मोनाली) भिसे असून, त्या पहिल्यांदाच आई होणार होत्या. मात्र, हॉस्पिटलच्या आडमुठ्या धोरणामुळे त्यांचे मातृत्वाचे स्वप्न अपूर्ण राहिले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने आरोग्य सेवेतील संवेदनशीलता आणि खासगी रुग्णालयांच्या व्यावसायिक धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

हे वाचलं का?

कोण होत्या तनिषा भिसे?

तनिषा भिसे या सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (PA) आहेत. तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांना पहिल्यांदाच बाळ होणार होते. त्यांच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण होता, परंतु तो आनंद काही तासांतच शोकात बदलला. तनिषा यांना जुळ्या मुलींना जन्म देण्याची संधी मिळाली, पण स्वतःचा जीव वाचवता आला नाही.

हे ही वाचा>> जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा? भाजप आमदाराच्या PA च्या पत्नीचा मृत्यू, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गंभीर आरोप

नेमकं काय घडलं?

30 मार्च 2025 रोजी तनिषा यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने उपचारांची गरज होती, म्हणून कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपये जमा करण्याची अट घातल्याचा आरोप तनिषा यांचे कुटुंबीय आणि आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. 

कुटुंबीयांकडे तात्काळ इतकी मोठी रक्कम जमा करण्याची क्षमता नव्हती. परिणामी, हॉस्पिटलने तनिषा यांना दाखल करून घेण्यास नकार दिला.

सकाळी 9 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या तनिषा यांना दुपारी 2 वाजेपर्यंत उपचार मिळाले नाहीत, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. शेवटी, कुटुंबीयांनी त्यांना पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात हलवले. तिथे तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तनिषा भिसेच्या कुटुंबीयांचे आरोप

तनिषा यांच्या वहिनी प्रियांका पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "हॉस्पिटलने सांगितले की, सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्याने बाळांना NICU मध्ये ठेवावे लागेल. दोन्ही बाळांसाठी प्रत्येकी 10 लाख, म्हणजे एकूण 20 लाख रुपये खर्च येईल, असे त्यांनी सांगितले. आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी 10 लाख रुपये आधी जमा करण्यास सांगितले. पैसे नसल्यास ससून रुग्णालयात जा, असेही सुचवले. हे सर्व तनिषा यांच्यासमोरच बोलले गेले, ज्यामुळे त्यांच्यावर मानसिक दबाव आला."

हे ही वाचा>> 10 लाख रुपयांसाठी महिलेला दाखल करून न घेणाऱ्या पुण्यातील दिनानाथ रुग्णलयाचा नेमका इतिहास काय?

सुशांत भिसे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की, जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने वेळीच उपचार सुरू केले असते, तर तनिषा यांचा जीव वाचला असता. आमदार गोरखे यांनीही हॉस्पिटलच्या या वागणुकीला "अमानवीय" आणि "मुजोर" असे संबोधले आहे.

दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा खुलासा

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितले की, "रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला नव्हता. त्या वेळी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नव्हती, म्हणून कुटुंबीयांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता." हॉस्पिटलने स्वतःला एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून संबोधले असून, रुग्णसेवा हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचा दावा केला आहे.

राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया

या घटनेनंतर आमदार अमित गोरखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या निकटवर्तीयाची ही अवस्था असेल, तर सामान्य माणसाचे काय होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी." त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही ठरवले आहे. सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. अनेकांनी "हॉस्पिटल्स माणुसकीसाठी की पैशासाठी?" असा सवाल उपस्थित केला आहे. तनिषा यांच्या मृत्यूने खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

नवजात जुळ्या मुलींची कशी स्थिती?

तनिषा यांनी जन्म दिलेल्या जुळ्या मुली सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात NICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु त्यांना त्यांच्या आईच्या मायेची उणीव कायम भासणार आहे.

तनिषा भिसे यांचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा शोक नाही, तर संपूर्ण समाजाला आरोग्य सेवेतील उणिवांवर विचार करण्यास भाग पाडणारी घटना आहे. या प्रकरणातून सरकार आणि समाजाला काही धडा मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    follow whatsapp