Gateway of India Boat Accident: 'स्पीड बोट चालक तर स्टंटच...', 'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!

मुंबई तक

19 Dec 2024 (अपडेटेड: 19 Dec 2024, 11:22 AM)

Mumbai Gateway of India Boat Accident: गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटा गुहेकडे जाणाऱ्या नीलकमल नावाच्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिली. ज्याचा व्हीडिओ शूट करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने आता नेमकी घटना सांगितली आहे.

'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!

'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!

follow google news

मुंबई: मुंबईत बुधवारी संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान जाणाऱ्या नीलकमल या फेरी बोटला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 115 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण बेपत्ता असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हा अपघात आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने आता संपूर्ण घटनेची माहिती मुंबई Tak ला दिली आहे.

हे वाचलं का?

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटा गुहेकडे जाणाऱ्या नीलकमल नावाच्या बोटीला दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिली, त्यानंतर बोट उलटली. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी एअरक्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केले.

दरम्यान, नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय नौदलाच्या स्पीड बोटीचे इंजिन चाचणी मुंबईतील समुद्रात सुरू असताना इंजिनमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे बोटीवरचे नियंत्रण सुटले, त्यामुळे ही घटना घडली.

स्पीड बोट चालक स्टंट करतोय असं वाटलं म्हणून मी मोबाइलमध्ये Video शूट केला - प्रत्यक्षदर्शी

दरम्यान, या अपघाताचा नेमका व्हीडिओ हा राजस्थानच्या जालोर येथील रहिवासी श्रवण कुमारने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वत: श्रवण कुमार हा नीलकमल बोटीमध्ये होता. श्रवणने सांगितले की, 'नौदलाची स्पीड बोट स्टंट करत होती. म्हणून मी, मोबाइलमध्ये त्यांचा व्हीडिओ शूट करायला सुरूवात केली. पण काही क्षणातच बोट आमच्या फेरीला धडकली.'

श्रवण कुमारने शूट केलेला हाच व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इतर प्रत्यक्षदर्शींचं काय आहे म्हणणं?

या घटनेचे साक्षीदार असलेल्या इतर बोटींच्या चालकांचे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी भीषण घटना पाहिली नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पायलट बोटीचे चालक आरिफ म्हणाले की, 'जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा परिस्थिती अत्यंत दुःखद होती आणि गोंधळ उडाला होता. लोक मदतीसाठी ओरडत होते. काही लोक रडत होते. आम्ही आधी महिला आणि मुलांना वाचवायला सुरुवात केली.'

तर दुसऱ्या पर्यटक बोटीचे चालक इक्बाल यांनी सांगितले की, 'नीलकमल बोट जेव्हा एलिफंटा गुहेकडे निघाली त्याच्या 25 ते 30 मिनिटांनंतरच मला वाटले की बोटीला अपघात झाला आहे. तिथे पोहचणाऱ्यांपैकी पहिल्या काही लोकांमध्ये आम्ही होतो. आम्ही तिथे गेलो तेव्हा बोट उलटली होती आणि लोक मदतीची याचना करत होते.'

'बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते'

ज्या बोटी उलटल्या त्या बोटीची बसण्याची क्षमता 80 होती मात्र त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त लोक बसले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या मदतीने आम्ही मदत आणि बचाव कार्य सुरू केल्याचे नौदलाचे म्हणणे आहे. या कारवाईत नौदलाची चार हेलिकॉप्टर, 11 जहाजे, एक तटरक्षक नौका आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटींचा सहभाग होता.

जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात थोडक्यात बचावलेल्या 22 वर्षीय मुंबईतील नथुराम चौधरीच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

दरम्यान, या घटनेबाबत निवेदन देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून भारतीय न्यायाच्या कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८२, ३२४(३)(५) अन्वये तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp