Ajit Pawar Jitendra Awhad News : शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन अजित पवार वेगळं झाले. त्यानंतर ते सातत्याने शरद पवारांना लक्ष्य करताना दिसत आहेत. पण, यात अजित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यातील सुप्त संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यात अजित पवारांच्या बारामतीतील विधानाने भर टाकलीये.
ADVERTISEMENT
“कुणी भावनिक होतील. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील… अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील… त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, अशी टीका अजित पवारांनी शरद पवारांवर केली.
जितेंद्र आव्हाड-अजित पवार राजकीय वाद
अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात फारसं सख्ख्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीही दिसून आलेलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. बंड केल्यापासून आव्हाड अजित पवारांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत आहेत.
हेही वाचा >> सरन्यायाधीशांच्या संतापाचा कडेलोट, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश
त्यातच शरद पवारांबद्दल अजित पवारांनी हे विधान केल्याने जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले.
“आपल्या काकाच्या मृ्त्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरु नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली”, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.
जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेनंतर अजित पवारांवर शरद पवार गटातील इतर नेत्यांनीही टीका केली. विधानामुळे दोन्ही गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिले.
नाटकीबाज म्हणत आव्हाडांना सुनावलं
शरद पवार गटाकडून टीका सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी एक ट्विट केले. ज्यात ते म्हणाले, “काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी.”
हेही वाचा >> आरोपींचं जेवण, फरशीवर झोपले; भाजप आमदाराची कोठडीत अशी गेली रात्र
“हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे”, असे म्हणत अजित पवार आव्हाडांना नाव घेता नाटकीबाज म्हणाले.
अजित पवारांच्या या टीकेला आव्हाडांनी काय दिलं उत्तर?
अजित पवारांनी ट्विट करून उत्तर दिल्यानंतर आव्हाडांनी एक ट्विट केले. ते म्हणाले की, “नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा.”
“तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच, नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती. आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते”, असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा >> 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला
अजित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आव्हाडांनी कावळ्याचा शाप असा उल्लेख करत अजित पवारांना टोला लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
ADVERTISEMENT