Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) 'भारत जोडो न्याय यात्रा' करत आहे. सध्या ही न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून आज (13 मार्च) धुळे जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी 'नारी न्याय' अशा नावाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधींनी या मेळाव्यातून सरकारवर निशाणा साधला. तसंच, महिलांसाठी त्यांनी 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत.
ADVERTISEMENT
या 'न्याय गॅरंटी' अंतर्गत, आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील महिलांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी काँग्रेसची ही तयारी सुरू आहे. देशातील तरूणांमध्ये वाढती बेरोजगारी पाहता काँग्रेसने अलिकडेच 'युवा न्याय' गॅरंटी आणली होती. याबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही होती की, याअंतर्गत बेरोजगार तरूणांना एक लाख रूपयांची मदत आणि पहिली कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसंच महिलांसाठी काँग्रेसने 'नारी न्याय'चे आयोजन केले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
'नारी न्याय गॅरंटी' अंतर्गत काँग्रेसने देशातील महिलांसाठी केल्या 5 मोठ्या घोषणा!
1. महालक्ष्मी गॅरंटी- या गॅरंटी अंतर्गत, देशातील सर्व गरीब कुटुंबातील एका महिलेला वार्षिक एक लाख रुपयांची मदत दिली जाईल. म्हणजेच या अंतर्गत महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याची व्यवस्था काँग्रेस पक्ष करत आहे.
2. अर्धी लोकसंख्या-पूर्ण हक्क- या गॅरंटी अंतर्गत, केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर, केंद्रातील सर्व नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना निम्मे अधिकार मिळतील. म्हणजे नोकऱ्यांमध्ये ५० टक्के महिलांच्या नियुक्तीची चर्चा आहे.
3. शक्तीचा सन्मान- या गॅरंटी अंतर्गत केंद्र सरकार अंगणवाडी, आशा आणि मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात त्यांचे योगदान दुप्पट करेल.
4. अधिकार मैत्री- या गॅरंटी अंतर्गत, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये एक पॅरालीगल अर्थात कायदेशीर सहाय्यक म्हणजेच अधिकार मैत्री म्हणून नियुक्त केला जाईल. या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव होईल.
5. सावित्रीबाई फुले वसतिगृह- भारत सरकार देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये नोकरदार महिलांसाठी किमान एक वसतिगृह बांधेल. त्यामुळे देशातील वसतिगृहांची संख्या दुप्पट होईल.
महिलांसाठीच्या या 5 गॅरंटी शेअर करताना काँग्रेसने लिहिले की, 'आमच्या गॅरंटी ही पोकळ आश्वासनं आणि विधानं नाहीत हे सांगायची गरज नाही. आमचे शब्द काळ्या दगडावरच्या रेघेसारखे आहेत जे कधीही पुसले जाणार नाहीत. आम्ही जे काही बोलतो ते करून दाखवतो. जसं कर्नाटक आणि हिमाचलमध्ये केलं आहे.'
ADVERTISEMENT
