Manoj Jarange : जरांगेंची एसआयटी चौकशी करणार; फडणवीसांची विधानसभेत काय सांगितलं?

मुंबई तक

27 Feb 2024 (अपडेटेड: 27 Feb 2024, 02:37 PM)

Manoj Jarange protest SIT Devendra Fadnavis

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची होणार एसआयटी चौकशी.

SIT will investigate Manoj Jarange's Maratha movement

follow google news

Manoj Jarange Devendra Fadnavis SIT : मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज विधानसभेत याचे पडसाद उमटले. आमदार आशिष शेलार यांनी जरांगेंचा बोलविता धनी कोण आहे, असे म्हणत एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली. (Devendra Fadnavis announced that SIT will investigate Manoj Jarange's Maratha movement)

हे वाचलं का?

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. "मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात असेल तर विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली. आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी जरांगे यांच्या मागे कोण आहे?", असे प्रश्न शेलारांनी उपस्थित केले. 

 

शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. "हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला कुठलेही स्थान नाही. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणे घातक असेल. त्यामुळे याची सखोल चौकशी शासनाने करावी", असे नार्वेकर म्हणाले. 

त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. फडणवीस म्हणाले, "अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन होईल. मला या विषयावर बोलण्याची इच्छा नव्हती. पण, महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला माहितीये की, मी मराठा समाजासाठी काय केलं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मुख्यमंत्री असेपर्यंत ते सुप्रीम कोर्टातही टिकवलं."

"मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी जे काही केलं ते मराठा समाजाला आहे. मनोज जरांगे माझ्याबद्दल बोललण्यानंतर मराठा समाजा माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या नाही. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल", असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

- सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे.
- पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील?
- तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच.
मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही.पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल.
- छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल !

 

    follow whatsapp