जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्यामुळे चर्चेत आलेल्या संजय पवार यांची पक्षाकडून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय पवार यांनी धरणगाव बाजार समिती निवडणुकीत नव्या पॅनेलचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले होते. त्याचबरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीत अजित पवार आणि शरद पवार-नरेंद्र मोदी यांचे फोटोही दिले होते.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी संजय पवार यांना पक्षातून बडतर्फ केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, पक्ष नेत्यांचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या वतीने गर्जे यांनी दिला आहे.
दोन जाहिराती, एक पॅनेल… संजय पवारांनी नेमकं काय केलं?
संजय पवार यांनी जळगाव जिल्हा बँक चेअरमनपदाच्या निवडणुकीवेळीच पक्षाविरोधात बंडाचं निशाण फडकावलं होतं. या निवडणुकीत पवारांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव केला होता.
दरम्यान, धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संजय पवार यांनी शिवसेना (शिंदे)-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनेल स्थापन करून निवडणूक लढवली.
हेही वाचा >> Rahul Narvekar : कट्टर शिवसैनिक राहिलेल्या नार्वेकरांनी किती पक्ष बदलले?
या निवडणुकीत संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो असलेले बॅनर्स, पोस्टर्स धरणगावमध्ये लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेस-संजय पवार गट असल्याचं सांगून पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला होता.
हेही वाचा >> Karnataka : तोडगा निघाला, शपथविधी ठरला! सिद्धरामय्या CM, डीके शिवकुमार DCM
हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पक्षाकडे मांडला होता. त्यांनी तक्रार केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा कोणताही गट नाही. हे पोस्टर्स, बॅनर्स तातडीने काढून टाकण्याच्या सूचना पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी संजय पवार यांना दिल्या होत्या. पण, संजय पवार यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. खुलासाही केला नाही.
स्वतःच केली विधानसभेच्या उमेदवारीची घोषणा
संजय पवार यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार करताना एका सभेत स्वतःच्या आमदारकीच्या उमेदवारीचीही घोषणा करून टाकली. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपणच उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांना पक्षातून बडतर्फ केले.
हेही वाचा >> आधी बोलायचा ताई, नंतर बनली गर्लफ्रेंड; तुकडे-तुकडे केले अन्… अंगावर काटा आणणारी कहाणी
वाढदिवस गिरीश महाजनांचा; अजित पवार, शरद पवारांचे फोटो
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संजय पवार यांनी लोकमत दैनिकात शुभेच्छा देणारी जाहिरात दिली. या जाहिरातीत संजय पवारांनी स्वतःला सहकारातील महामेरू असं म्हटलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकत्रित फोटो, तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांसोबत छापला होता.
ADVERTISEMENT