Chhatrapati shivaji maharaj hospital kalwa : ठाणे महापालिकेचे कळव्यातील रुग्णालयात आधी एका दिवसात पाच, तर आता एका रात्री 18 रुग्णांचा मृत्यू झालाय. यावरून नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केलेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. पण, प्रश्न असा उपस्थित झाला की, 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? याच प्रश्नावर रुग्णालय प्रशासनाने अखेर खुलासा केलाय. (Why 18 patients died in Kalwa hospital)
ADVERTISEMENT
18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की, “काल रात्री रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 6 रुग्ण असे होते की, जे 24 तासांच्या आत गेलेले आहेत. म्हणजे काही लोक पाऊण तासात. काही लोक अर्ध्या तासात. यातील 5 रुग्ण असे होते की, ज्यांना ताप आणि दम लागणे म्हणजेच फुफ्फुसात संसर्ग झालेला होता. एकाच उदाहरण देतो, बाकी सगळे त्याच प्रकारचे होते. एका रुग्णाच्या प्लेटलेट्स 6000 होत्या.”
अल्सर फुटल्याने एका महिलेचा मृत्यू
“अत्यावस्थ रुग्ण येतात. आल्या आल्या आम्ही त्यांना बघितलं, पण रुग्ण दगावला. असे अजून चार रुग्ण आहेत. एक रुग्ण अशी होती जिचा अल्सर फुटलेला होता. ती रुग्ण इतकी अत्यवस्थ होती की, पाच मिनिटं उशीर झाला असता, तर रुग्णालयात यायच्या आधीच मृत्यू झाला असता. तिला आयव्ही देऊन हार्ट चालू केलं. पण, तिचा मृत्यू झाला”, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाचा >> “…तर अशा मुख्यमंत्र्यांची ठाण्याला गरज नाही”
“एक रुग्ण असा होता की ज्याने रॉकेल (केरोसिन) पिलेलं होतं. चार वर्षाचा मुलगा होता. भरपूर केरोसिन पिऊन आलेला होता. नाही वाचवू शकलो. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये एकाला साप चावलेला होता. यात काही रुग्ण चार दिवसांपासून होते. काही पाच दिवसांपासून होते. एक अज्ञात रुग्ण होती, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. तिला ब्रेन ट्रॉमा होता”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
दोघांची फुफ्फुस झाली होती खराब
“दोन रुग्ण असे होते की, त्यांची फुफ्फुस खराब झाले होते. त्यांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. तीन-चार रुग्ण असे होते की, मल्टि ऑर्गन डिसफंक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला. काही अनियंत्रित मधुमेह होता. काही ह्रदयाचा आजार होता. त्यामुळे हे रुग्ण मरण पावले”, असे प्रशासनाने म्हटले आहे.
वाचा >> मीरा रोड : मुलीचं प्रकरण… विद्यार्थ्याने शिक्षकावर रस्त्यावरच केले सपासप वार
“रुग्णालयात 500 बेडची व्यवस्था आहे, पण आम्ही 600 रुग्ण दाखल करून घेतलेले आहेत. आम्ही पूर्ण शक्तिनिशी काम करत आहोत. अधिकारी-कर्मचारी 24-24 तास काम करताहेत. आम्ही कोणत्याही रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार देत नाहीये. कारण इथे गरीब माणसं येतात. काही लोक खासगी रुग्णालयात जातात. तीन-चार दिवस उपचार घेतात. पैसे नाहीत म्हणून मग इकडे येतात. काही लोक अत्यवस्थ झाल्यानंतर इकडे येतात. आम्ही जे जे आमच्याने होतं, ते आम्ही करतोय”, अशी भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत काय म्हणाले?
“नेमकं काय झालं, याची कल्पना अधिष्ठातांना असेल. त्यांचं दुर्लक्ष झालं की, काय झालं, हे अहवाल आल्यानंतरच भाष्य करणं योग्य ठरेल. जे घडलं ते दुर्दैवी आहे. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्याच्यावर कारवाई केली जाईल”, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
ADVERTISEMENT