BMC Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी व्यवहाराचे नवे आकडे समोर आणले आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपाचा रोख संजय राऊत यांच्याकडे दिसून येत असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार राऊतांना घेरण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा दबक्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
बृहन्मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटप योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या आधारावर ईडीने गुन्हा दाखल केला. 17 जानेवारी रोजी ईडीने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना अटक केली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले.
कुणाला किती लाख दिले गेले, सोमय्यांनी सांगितली रक्कम
वैश्य सहकारी बँकेतून झालेल्या व्यवहाराच्या नोंदी किरीट सोमय्यांनी दाखवल्या आहेत. यात त्यांनी संजय राऊतांच्या कुटुंबातील आणि त्यांच्या मित्रांना पैसे आल्याचे म्हटले आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंट (राजीव साळुंखे) च्या खात्यातून हे पैसे गेल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >> खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story
मुंबई महापालिकेने 6.37 कोटी रुपये खिचडी कंत्राट देण्यात आलेल्या सह्याद्री रिफ्रेशमेंटला पाठवले गेले होते. त्यापैकी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम संजय राऊत आणि त्यांच्या मित्रांच्या खात्यात जमा करण्यात आले, असा दावा सोमय्यांनी केला आहे.
हेही वाचा >> काय आहे खिचडी घोटाळा, ठाकरेंचे निकटवर्तीय चव्हाणांना का झाली अटक?
कोणत्या तारखेला कुणाच्या खात्यात पैसे जमा झाले, याबद्दलची माहिती सोमय्यांनी दिली आहे. संजय राऊत यांची मुलगी विधिता राऊत यांच्या खात्यात 12.75 लाख जमा केले गेले. संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांच्या खात्यात 6.25 लाख जमा केले गेले. पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात 41.80 लाख जमा केले गेले, असे सोमय्यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांना घेरण्याची तयारी
खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाकडून सातत्याने भाजप-शिंदेंची सेना यांच्यावर टीका करत आहे. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जास्त आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या नेत्याविरोधातील केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत.
त्यातच आता किरीट सोमय्या यांनी ज्यांना पैसे मिळाले, ते सगळे कसे संजय राऊतांशी संबंधित आहेत, हेच अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यामुळे या प्रकरणाच्या माध्यमातून संजय राऊतांना घेरण्याची भाजपची तयारी सुरू झाली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ADVERTISEMENT