Kolhapur : गोकुळ दूध संघाचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं, का झाला राडा?

भागवत हिरेकर

14 Oct 2023 (अपडेटेड: 14 Oct 2023, 03:29 PM)

Kolhapur Gokul Dudh Sangh : ऑफिसमधील दोन इंटरकॉम फोन आणि साहित्याची तोडफोड केली. अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे एकच पळापळ सुरू झाली.

mns workers vandelized gokul dudh sangh office in borude

mns workers vandelized gokul dudh sangh office in borude

follow google news

-दीपक सुर्यवंशी, कोल्हापूर

हे वाचलं का?

Kolhapur Gokul Dairy MNS Workers : गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात मनसे पदाधिकार्यांनी राडा घातला. मनसे पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलवण्यात आलेलं होतं. त्याच दरम्यान पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या काचा फोडत राडा केला. अधिकारी आणि कर्मचारी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि तोडफोड केली, असं युवराज येडूरे यांनी सांगितलं.

गोकुळ दूध संघाने दर कपात केलेल्या गाईच्या दूधाचा दर पूर्ववत करावा, अशी मागणी मनसेने केली होती. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी गोकुळ दूध संघाच्या बोरवडे येथील दूध शीतकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांना 12 ऑक्टोबर रोजी निवेदन दिलं होतं. त्याची तात्काळ दखल न घेतल्यास संचालकांच्या घरावर गाई-म्हशींसह मोर्चा काढण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता.

हेही वाचा >> Manoj Jarange : ‘लावलं रताळू आली केळी’, जरांगेंवर गुणरत्न सदावर्तेंचा वार

इशारा देऊनही मागणीची कोणतीच दखल न घेतल्याने मनसे कार्यकर्ते बोरवडे येथील गोकुळ दूध संघाच्या शीतकरण केंद्रावर आले होते. यावेळी संकलन सुरु असल्याने शाखाप्रमुख विजय कदम यांनी मनसेचे कक्ष जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांच्यासह पाच जणांना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावले.

मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात का केली तोडफोड?

यावेळी युवराज येडूरे म्हणाले, “गाईच्या दूध दर कपात केल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचण आले आहेत. त्यामुळे दर कपात रद्द करावी.’ पण, समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याने चर्चा सुरु असतानाच अचानकपणे कार्यकर्त्यांनी खोलीच्या खिडकीच्या काचा फोडल्या.

गोकुळ कार्यालयातील साहित्य फोडले

ऑफिसमधील दोन इंटरकॉम फोन आणि साहित्याची तोडफोड केली. अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. यावेळी गोकुळचे काही कर्मचारी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेला.

पोलिसांची मध्यस्थी, कर्मचारी जखमी

पोलीस निरीक्षक गजानन सरगर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ गोकुळचे कर्मचारी आणि मनसेचे कार्यकर्ते यांना वेगळे केलं. दरम्यान, फुटलेल्या काचा उडून उपस्थित कर्मचार्‍यांना लागल्याने ते जखमी झाले आहेत. अचानक सुरू झालेल्या या वादामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नसती, तर दोन्ही गट समोरासमोर येऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले असते.

हेही वाचा >> उदयनराजे भोसले राजकारणातून होणार निवृत्त? चक्क शरद पवारांनाही दिला सल्ला!

याबाबत शाखाप्रमुख विजय कदम म्हणाले, “वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामध्ये काही कार्यकर्ते मद्यप्राशन करून आले होते”, असा आरोप त्यांनी केला.

मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली असून पोलिसांनी युवराज रामचंद्र येडुरे, रोहन निर्मळ, विनायक आवळे, प्रविण दत्तात्रय मनुगडे, निखिल परीट, सौरभ कांबळे यांना ताब्यात घेतले आहे.

    follow whatsapp