Manoj Jarange Health Update : (इसरार चिश्ती, अंतरवाली सराटी) मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज (१४ फेब्रुवारी) पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहेत. पण, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने उपस्थित लोकांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं, यासाठी सगेसोयरे शब्दाची व्याख्या करावी. तसेच त्यासंदर्भात अधिसूचना काढून तिची अंमलबजावणी करावी. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे.
मनोज जरांगेंच्या नाकातून येतंय रक्त
ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही जातप्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंची आहे. या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सरकारकडून यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांची आहे.
यासाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केले असून, त्यांची प्रकृती मात्र साथ देताना दिसत नाही. तिसऱ्यांदा उपोषण करत असलेल्या जरांगे यांची प्रकृती पाचव्या दिवशी कमालीची खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त यायला लागल्याने उपोषण स्थळी बसलेले नागरिक भावूक झाले आहेत. जरांगे यांची ढासळलेली प्रकृती बघून उपस्थित असलेल्या महिला रडत आहेत. तर लोकही भावूक होत आहे. लोकांकडून पाणी पिण्याची विनंती जरांगेंना केली जात आहे.
समर्थकांकडून त्यांना पाणी पिण्याची विनंती केली जात आहे, पण जरांगेंनी पाणी पिण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही, उपचार घेण्यासही जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे प्रकृती चिंताजनक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT