संजय राऊत यांना शिंदे-फडणवीस सरकारबद्दल बोलणं चांगलंच अंगलट आलंय. सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर शिंदे-ठाकरे गटात नव्यानं वाकयुद्ध सुरू झालंय. याच वाकयुद्धानं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्यात. त्यामुळेच राऊतांचाही नारायण राणे होणार का? अशी चर्चा सुरू झालीये. राऊत असं काय बोलले की, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि राऊतांचा राणे होणार का? हे प्रश्न उपस्थित झालाय.
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टानं 11 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. स्वतः राजीनामा दिल्यानं उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणं शक्य नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं सांगितलं. त्याचवेळी कोर्टानं विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांची कृतीही बेकायदेशीर ठरवली. त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.
नाशिकमध्ये संजय राऊत काय बोलले होते?
“कुणीही कितीही बदनाशी करण्याचा प्रयत्न केला, तरी सर्वोच्च न्यायालयाची लक्ष्मण रेषा डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. म्हणून राज्यातील प्रशासन आणि पोलिसांना माझं आवाहन आहे की, बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. तुम्ही अडचणीत याल. बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश जर पाळाल, तर तुम्ही अडचणी याल. तुमच्यावर खटले दाखल होतील. शिंदे-फडणवीस कुणी काही म्हणू द्या. त्यांचे पोपटलाल काही म्हणू द्या. हे सरकार जातंय”, असं संजय राऊत नाशिक येथे बोलताना म्हणाले होते.
हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
पण राऊतांना हीच भूमिका मांडणं अंगलट येताना दिसतेय. शिंदे सरकारचे आदेश ऐकू नका, असं सांगणाणाऱ्या संजय राऊतांविरोधात नाशिक पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलाय. आयपीसीच्या कलम 505/1 (ब) नुसार पोलिसांप्रती अप्रितीची भावना निर्माण करणे, चिथावणे या आरोपाखाली हा गुन्हा नोंद झालाय.
शिंदे-फडणवीसांना सवाल, राऊतांच्या ट्विटमध्ये काय?
राऊतांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. माझा गुन्हा काय असा सवाल केलाय. संजय राऊतांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, “नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भादंवि कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय?”, असा सवाल राऊतांनी केला.
हे बघा >> Imtiaz Jaleel यांनी केलेल्या टीकेवर कालीचरण बाबा यांचं प्रत्युत्तर
“सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे ‘गठन’ बेकायदेशीर ठरले आहे. व्हीप पासून शिंदे यांना गटनेतेपदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटनाविरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे.
या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल”, असं राऊतांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे गुन्हा दाखल होण्याच्या अगदी तोंडावर भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांना 90 दिवसांत जेलमध्ये जावं लागेल, असा दावा केलाय. त्यामुळेच राऊतांचाही राणे होणार का, अशा चर्चांना उधाण आलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. एवढंच नाही, तर केंद्रीय मंत्री असतानाही भरल्या ताटावरून राणेंना पोलिसांनी अटक केली होती. तीच गोष्ट आता राऊतांसोबतही होणार का? अशा चर्चा सुरू झाल्यात.
ADVERTISEMENT