Nitin Desai Suicide Case FIR: मुंबई: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. स्टुडिओसाठी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचं कर्जच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलं असून आता याच प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. (nitin desai suicide case wife neha desai give statment to police fir karjat nd studio)
ADVERTISEMENT
नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत आपला जबाब नोंदवला असून त्यांच्याच तक्रारीनुसार केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, EARC कंपनीचे आर के बन्सल आणि प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आपल्या तक्रारीत नेहा देसाई यांनी याप्रकरणी पोलिसांना जो जबाब नोंदवला आहे आणि जी तक्रार दिली आहे त्यात त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. पाहा हीच FIR जशीच्या तशी:
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील FIR
फिर्यादी यांचे पती नितीन चंद्रकांत देसाई यांनी ECL फायनान्स कंपनीकडुन घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्याच्या दृष्टीने फायनान्स कंपनीचे 1 ) केयुर मेहता 2) रशेष शहा 3 ) स्मित शहा 4 ) EARC कंपनीचे आर के बन्सल, आरोपीत नं. 5) प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी एन. डी. स्टुडीओ च्या कर्जाच्या वसुलीकरीता मयत यांना प्रचंड मानसिक त्रास देवून मयत यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयांचा तपास वरीष्ठांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम सो हे करीत आहेत.
जबाब दिनांक 04/08/2023
मी, नेहा नितीन देसाई, वय 55 वर्षे, व्यवसाय- गृहीणी / व्यवसायीक, सध्या रा. एन. डी. फिल्म स्टुडीओ, हातनोली, पो.चौक, ता.खालापूर, जि, रायगड, समक्ष जबाब देते कि,
वरील मुंबई येथील पत्त्यावर मी, माझे पती नितीन चंद्रकांत देसाई, व लहान मुलगी तन्वी असे एकत्र कुटुंबात राहण्यास आहे. माझी मोठी मुलगी मानसी हिचे लग्न झाले असुन ती सध्या अमेरिका येथे वास्तव्यास आहे. तर मुलगा कांत हा शिक्षणा निमीत्त अमेरिका येथे राहण्यास आहेत. मी व माझे पती अधुन मधुन एन. डी. फिल्म स्टुडीओ येथे राहण्यास येत होतो. आमचे लग्न सन 1992 साली झालेले आहे.
दिनांक 02/08/2023 रोजी सकाळी 09.00 वाजण्याचे सुमारास मी माझे मुंबई येथील घरी असताना मला फोनव्दारे पती नितीन चंद्रकांत देसाई यांनी आमचे चौक कर्जत येथील एन. डी. फिल्म स्टुडीओ, येथे गळफास घेवुन आत्महत्या केली आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ मुंबई येथुन निघुन आमचे चौक कर्जत येथील स्टुडीओ येथे आले. त्यावेळी माझे पती यांचे प्रेत आमचे स्टुडीओ मधील मेगा/बिग फ्लोअर या ठिकाणी रंगमंचावर रस्सीने गळफास घेवुन लटकलेल्या स्थितीत होते.
माझे पती यांनी असे का व केव्हा केले याबाबत माहिती घेतली असता मला अशी माहिती मिळाली कि, माझे पती हे दिनांक 02/08/2023 रोजी रात्री 02.00 वाजण्याचे सुमारास स्टुडीओ मध्ये आले असुन त्यांनी स्टुडीओ मध्ये आल्यानंतर झोपण्यापुर्वी त्यांचा केअरटेकर म्हणुन काम पाहणारा योगेश ठाकुर यास ते वापरत असलेल्या व्हाईस रेकॉर्डर मध्ये काही व्हाईस क्लीप आहेत त्या क्लीप सकाळी 08.30 वाजता अँड.वृंदा हिस तीचे व्हॉटसअँप वर पाठव असे सांगितले होते. त्या व्हाईस क्लीप मध्ये काय आहे याची खात्री करण्यासाठी अँड वृंदा हिचेशी संपर्क केला.
त्यानंतर काही वेळामध्ये अँड वृंदा विचारे या स्टुडीओ मध्ये आल्या. त्यावेळी मी त्यांचे मोबाईल मध्ये असलेल्या व्हाईस क्लीप ऐकल्या असता त्या व्हाईस क्लीप मध्ये असलेला आवाज हा माझे पती नितीन चंद्रकांत देसाई यांचाच होता. ते त्या व्हाईस क्लीप मध्ये ” रशेष शहा हा गोडबोल्या असुन त्याने छोटया मोठया उद्योजकांसाठी कष्टाने बनविलेला माझा स्टुडीओ गिळण्याचे काम केले. 100 फोन केले परंतु फोन उचलत नाही. 138, EOW, NCLT, DRT, यांच्याकडुन प्रचंड छळवाद केला. माझेकडे दोन- तीन इनव्हेस्टर गुंतवणुक करण्यासाठी तयार असताना मला सहाकार्य केले नाही.
माझेवर डबल टिबल किमतीचा बोजा टाकुन प्रेशराईज केले., स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने प्रेशर करून मी दिलेल्या गोष्टी मान्य करीत नाहीत. स्मित शहा, केयर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडीओ लुटण्याचा, माझी नाचक्की करून मला घेरण्याचे काम करीत आहेत., या लोकांनी माझी वाट लावली आहे., मला पैशांच्या बाबतीत धमक्या देवुन नराधमांनी मला प्रेशराईज केले, सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले, एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडुन होत आहे. मला षडयंत्र करून, दडपुन टाकुन मला संपविले. माझे मनात नसतानाही त्यांनी करायला भाग लावलेले आहे.” असे व्हाईस रेकॉर्डींग मी ऐकले आहे.
माझे पती नितीन चंद्रकांत देसाई हे कला दिग्दर्शक होते. त्यांनी सन 2004 साला मध्ये हातनोली चौक या ठिकाणी एन. डी. स्टुडीओची स्थापना केली आहे. एन. डी. स्टुडीओ या आस्थापने मध्ये श्रीकांत गणपत देसाई उर्फ काका हे स्टुडीओ हेड म्हणुन काम पाहत आहेत. तर निलेश पांडुरंग जाधव, तन्मय वामन, प्रज्ञा सुर्वे हे अकाऊंटन्ट चे काम पाहत आहेत. तसेच वृंदा विचारे या कायदेशीर सल्लागार म्हणुन काम पाहत आहेत.
सदर स्टुडीओ आम्ही एन. डी. ज् आर्ट वर्ल्ड प्रा. लि. या नावाने चालवित असुन त्याचे डायरेक्टर म्हणुन आम्ही दोघेही आहोत. परंतु स्टुडीओची सर्व कामे हे माझे पती नितीन चंद्रकांत देसाई हेच पाहतात. आमचे स्टुडीओ मध्ये अनेक हिंदी, मराठी, चित्रपट, टि.व्ही.सिरियल यांची शुटींग होत असते. चित्रपट किंवा सिरियल करीता त्यांचे मागणीप्रमाणे सेट / देखावे तयार केले जातात. तसेच तयार केलेले सेट/ देखावे हे काही चित्रपटांसाठी भाडे तत्वावर दिले जातात.
एन. डी. स्टुडीओची स्थापना केल्यानंतर स्टुडीओचे कामकाजासाठी आम्ही सुरूवातीला अडीच लाखाचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड आम्ही मुदतीत केली आहे. त्यानंतर आम्ही स्टुडीओच्या कामाकरीता आवश्यकतेनुसार कर्ज घेतले असुन त्यांची देखील मुदतीत परतफेड केलेली आहे. त्यामुळे माझे पतीचा कर्ज घेवुन फसविण्याचा हेतु कधीच नव्हता.
माझे पती एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते त्यांचेकडे असलेली कामाची गुणवत्ता, कौशल्य पाहुन सन 2016 मध्ये ECL फायनांन्स / एडलवाईज ग्रुप बीकेसी कॉम्प्लेक्स कुर्ला मुंबई या फायनांन्स कंपनीचे अधिकारी रषेश शहा यांनी माझे पती यांना भेटुन कर्जाचा प्रस्ताव दिला. प्रस्तावामध्ये त्यांच्या फायनान्स कंपनी कडुन एन. डी. स्टुडीओ मध्ये गुंतवणुक करून आपण स्टुडीओ मध्ये अधिक वेगवेगळ्या प्रकारे नवनविन संकल्पना डेव्हलप करू असे गोड बोलुन, मोठी स्वप्ने दाखवुन अशा प्रकारे प्रस्ताव/लालच देवुन माझे पती यांना भुरळ घातली.
त्यानुसार माझे पती यांनी ECL फायनांन्स कंपनीकडुन दिनांक 02/11/2016 रोजी 150 कोटी रूपयांचे व त्यानंतर दिनांक 23/02/2018 रोजी 35 कोटी रूपयांचे कर्ज घेतले आहे. त्या बदल्यात एन. डी. स्टुडीओ ची जमीन तारण म्हणुन ठेवली आहे. आम्ही कर्जाचे हप्ते मुदतीत भरत असताना देखील एप्रिल 2019 महिन्यामध्ये ECL फायनान्स कंपनीने माझे पती यांना अगाऊ 06 महिन्याचे म्हणजेच मे 2019 ते ऑक्टोंबर 2019 या कालावधीचे हप्त्यांचे पैसे भरण्याकरीता प्रचंड प्रेशर टाकले. त्यामुळे माझे पती यांनी हिरानंदानी पवई येथील आमचे मालकीचे ऑफिस विकुन फायनान्स कंपनीचे अधिकारी यांनी मागणी केल्या प्रमाणे अगाऊ 06 महिन्यांच्या हप्ते देखील भरले होते. त्यानंतर माझे पती यांनी सन फेब्रुवारी 2020 सालापर्यंत व्याजासह कर्जाचे हप्ते भरलेले आहेत.
त्यानंतर सन मार्च 2020 सालामध्ये कोव्हीड-19 चे संकट संपुर्ण जगासह भारतावर आले. त्यामध्ये शासनाकडुन आलेल्या निर्बंधांमुळे सिनेमा/ मालिका यांचे शुटींग बंद झाल्यामुळे आमचा स्टुडीओ देखील बंद ठेवण्यात आला त्या कालावधीमध्ये आमचे स्टुडीओचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला होता. त्याच निर्बंधाच्या कालावधीमध्ये शासनाकडुन बँकांच्या कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यांमध्ये सवलती संबधी नियमावली जाहीर केली होती. कोव्हीड – 19 या माहामारीच्या कालावधी मध्ये व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ECL फायनान्स कंपनीकडुन घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे हप्ते देण्यास विलंब होवु लागला होता.
परंतु माझे पती यांनी महामारीच्या संकटाचे कारण न सांगता ECL कंपनीस कर्ज परतफेड करण्याची पुर्णपणे तयारी दाखविली. परंतु ECL कंपनीचे अधिकारी स्मित शहा व केयुर मेहता यांच्याकडुन नेहमीच कर्जाचे हप्ते भरण्यासंबधी प्रेशर करण्यात आले. या प्रचंड प्रेशर मुळे माझे पती यांनी ECL या फायनान्स कंपनीस One Time Settlement (OTS) चा प्रस्ताव दिला होता. माझे पती हे वेळोवेळी ECL कंपनीच्या अधिका-यांना भेटुन One Time Settlement (OTS) करण्याबाबत विनंती करीत होते.त्यावेळी ECL कंपनीचे अधिकारी केयर मेहता व स्मित शहा हे समक्ष भेटल्यानतंर आपण One Time Settlement (OTS) करू असे सांगत होते. परंतु त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही न करता त्यांनी अचानक माझे पती यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबतची नोटीस पाठवुन त्यांचेवर दबाव आणण्यास सुरवात केली.
त्यानंतर मी व माझे पती नितीन देसाई असे आम्ही आमचे स्टुडीओ मध्ये गुंतवणुक करण्याकरीता इन्व्हेस्टर आणत होतो परंतु फायनान्स कंपनीकडुन आम्हाला कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. माझे पती यांनी रषेश शहा यांना वारंवार फोन केला असता फोन उचलत नव्हते किंवा आम्हाला कोणतीही मिटींग देत नव्हते. यावरून ECL फायनान्स कंपनीस आमचे स्टुडीओमध्ये इन्व्हेस्टर येवु दयायचे नव्हते व आमची मालमत्ता बळकावयाची होती असा त्यांचा हेतु दिसु लागला या बाबीमुळे माझे पती हे मानसिक दडपणाखाली आले होते. त्यावेळी मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये ECL कंपनी कडुन आमचे एन. डी. स्टुडीओ यांना मेल प्राप्त झाला त्यामध्ये त्यांनी एन.डी. स्टुडीओ चा व्यवसाय प्लान व One Time Settlement (OTS) बाबत विचारणा केली होती.
त्यावेळी माझे पती यांनी त्यांना कर्जाचे रि स्ट्रक्चर किंवा One Time Settlement (OTS) या दोन्ही पैकी कोणत्याही एका बाबींवर तयारी दर्शविली होती व तसा प्लान देखील त्यांना दिला होता. परंतु सदरचा प्लान बाबत त्यांनी होकार किंवा नकार याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. परंतु एका बाजूला कर्जाचे रि स्ट्रक्चर किंवा One Time Settlement (OTS) यावर चर्चा करून आम्हाला गाफिल ठेवुन दुस-या बाजुला नोव्हेंबर 2021 मध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता कर्जाची हमी रक्कमेचा दिलेला चेक परस्पर बाऊनन्स करून घेऊन आम्हाला चेक बाऊन्सची कायदेशीर कारवाईची नोटीस पाठविली.
त्यामुळे मी आणि माझे पती वारंवार फायनान्स कंपनीचे कलिना येथील ऑफिस मध्ये जावुन केयर मेहता, स्मित शहा, यांचेशी चर्चा करत होतो. परंतु ते सर्वजण आम्हाला फक्त आश्वासन देत होते व ही एक आरबीआयची प्रोसेस आहे तुम्ही काळजी करू नका असे खोटे सांगुन कोणतेही सहकार्य करीत नव्हते. आम्हाला कोणत्याही प्रकारे सहकार्य होत नसल्याने आम्ही त्यांचे वरिष्ठ अधिकारी रशेष शहा यांना फोन करून विनंती करत होतो. परंतु ते देखील आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत होते.
त्यानतंर अचानक आम्हाला कोणतीही माहिती / खबर न देता ECL कंपनीने आमचे कर्ज CFM अँसेटस् या कंपनीस वर्ग केले. माझे पती यांनी त्याबाबत केयर मेहता व स्मित शहा यांना विचारणा केली असता तो आमचे फायनान्स कंपनीची अंतर्गत बाब आहे त्यामुळे आमचे वरिष्ठांनी कर्ज वर्ग केलेले आहे. या दरम्यान CFM कंपनीने विविध तपास यंत्रणा यांचेकडे तक्रारी करून माझे पती यांना मानसिक त्रास दिला आहे. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पुन्हा आम्हाला कोणतेही माहिती न देता पुन्हा आमचे कर्ज प्रकरण CFM अँसेटस् या कंपनीकडुन EARC या फायनान्स कंपनीकडे वर्ग केले. EARC फायनान्स कंपनीकडुन श्री. आर के बन्सल हे काम पाहत होते. त्यामुळे आम्ही आर.के. बन्सल यांचेशी संपर्क केला परंतु ते देखील One Time Settlement (OTS) चे आश्वासन देत राह पण काहीही केलेले नाही.
माझे पती यांनी कर्जाचे रि स्ट्रक्चर किंवा One Time Settlement (OTS) या बाबत प्रस्ताव दिला असताना सुद्धा केयर मेहता, स्मित शहा, रेषेश शहा, व आर. के. बन्सल हे आम्हाला फक्त गोड बोलुन आश्वासन देत होते व दुस-या बाजुने कर्ज परतफेडी साठी कारवाई करून प्रेशर आणत होते.
त्यांच्या या अशा खोटया व लबाडीच्या वागण्यामुळे माझे पती मानसिक दडपणाखाली येत होते. माझे पती यांचेवर असलेले मानसिक दडपणामुळे ते घरामध्ये कोणाशी काही न बोलणे, गप्प गप्प राहणे, किंवा कधीही चिडचिडेपणा करीत होते. मार्च 2023 मध्ये आम्ही दोघे घरामध्ये असताना माझे पती रडत होते व हे लोक माझ्या स्वप्नातील स्टुडीओ गिळंकृत करण्याचे तयारीमध्ये आहेत. त्यामुळे मला जिवन जगणे असह्य झाले आहे असे बोलून दाखवित होते. त्यावेळी मी त्यांना वारंवार धीर देत होते व यातुन काहीतरी मार्ग निघेल असे सांगायचे व मी स्वतः फायनान्स कंपनीचे अधिकारी केयर मेहता व स्मित शहा यांना सहकार्य करण्याची विनंती करीत होते परंतु ते त्यांनीही मला देखील फक्त खोटी आश्वासने दिली व आम्हाला कायदेशीर कारवाई साठी दबाव आणत होते.
दिनांक 29/07/2023 रोजी माझे पती नितीन देसाई हे अतिशय मानसिक दडपणाखाली असल्याचे मला जाणवल्यामुळे मी त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे काय झाल याबाबत विचारले असता त्यांनी,दिनांक 25/07/2023 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रॅब्यूनल (NCLT) मुंबई बेंच यांनी आपली एन.डी.ज् आर्ट वर्ल्ड प्रा. लि. या कंपनीस दिवाळखोर म्हणुन घोषीत केले व आपल्या कंपनीवर प्रशासक म्हणुन जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती केली आहे. प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी दिनांक 28/07/2023 रोजी आपले कंपनीस मेल करून कागदपत्रांचे मागणीचा तगादा लावला असुन दिनांक 29/07/2023 रोजी मोहरम ची सुट्टी असताना देखील जितेंद्र कोठारी यांनी आपल्या कंपनीतील निलेश जाधव व अँड. वृंदा विचारे यांना तसेच मला फोन करून कंपनीचा ताबा घेण्यासाठी रविवारी त्यांचे खाजगी बांऊसर घेवुन येत आहे.
NCLT न्यायालयाने जितेंद्र कोठारी यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती केली असताना त्यांनी आमचे कंपनीवर प्रशासक म्हणुन काम पाहणे अपेक्षीत होते परंतु ते फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरून जबरदस्तीने आपल्या स्टुडीओचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असुन स्टुडीओच्या जागेवर असलेली माझा कलामंच गिळंकृत करून त्या जागेवर खाजगी व व्यवसायीक बांधकाम करण्याचा त्यांचा कुटील हेतु आहे. तसेच फायनान्स कंपनीच्या या अडवणुकीच्या धोरणामुळे त्यांचे सुरू असलेले व्यवसायीक प्रोजक्ट बंद पडत असुन नविन प्रोजेक्ट येण्यास देखील अडचणी येत असुन ते देखील त्यांच्या नियमीत कामावर लक्ष देवु शकत नाही. या सर्व कारणांमुळे माझे सुमारे 100 कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे असे माझे पती यांनी मला सांगितले. या सर्व कारणांमुळे माझे पती यांनी प्रचंड टेन्शन घेतल्याने ते मानसिक दडपणाखाली गेले होते. त्यावेळी मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.
तरी माझे पती नितीन चंद्रकांत देसाई यांनी ECL फायनान्स कंपनीकडुन घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्याच्या दृष्टीने फायनान्स कंपनीचे 1 ) केयर मेहता 2) रशेष शहा 3 ) स्मित शहा 4) EARC कंपनीचे आर के. बन्सल, व प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी एन. डी. स्टुडीओ च्या कर्जाच्या
वसुलीकरीता माझे पती यांना प्रचंड मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळुन माझे पती यांची इच्छा नसतानाही त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे म्हणुन माझी वरील इसमां विरूद्ध कायदेशीर तक्रार आहे.
असं म्हणत नेहा देसाईंनी पाच जणांविरोधात त्यांच्या पतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसात केली आहे. आता याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने मांडली त्यांची बाजू
दरम्यान, याप्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांची बाजू मांडण्यासाठी एक प्रेस नोट जारी केली आहे. पाहा कंपनीने नेमकं काय म्हटलंय:
नितीन देसाई यांच्या निधनाने एडलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला अतीव दु:ख झाले आहे.
काही गैरसमज दूर करण्यासाठी, आम्ही एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की, नितीन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि खेळते भांडवल उभारण्यासाठी 2016 आणि 2018 मध्ये आर्थिक सहाय्य करण्यात आले होते. मात्र, 2020 सालापासून कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्याचे विविध प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
कंपनीला शेवटी 2022 मध्ये NCLT कडे पाठवण्यात आले आणि जुलै 2023 मध्ये NCLT मध्ये दाखल करण्यात आले.
Edelweiss ARC ने RBI ने निश्चित केलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले आहे आणि कायदेशीर चौकटीच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. कर्जावर आकारण्यात आलेला व्याजाचा दर देखील जास्त नव्हता किंवा कर्जदारावर कोणत्याही वेळी वसुलीसाठी अनावश्यक दबाव टाकण्यात आला नव्हता.
अशा दुःखद घटनांचा तपासबाबतची जी गरज आहे त्याचा आम्ही आदर करतो आणि तपास प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करू. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम केले आहे असा निष्कर्षही ते काढतील असा आम्हाला विश्वास आहे. नितीन देसाई यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी आणि कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे जी शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणि एनडी आर्ट्समधील कर्मचार्यांयबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो.
असं म्हणत संबंधित कंपनीने आता आपली बाजू देखील मांडली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस नेमकी कशा पद्धतीने कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT