NCP Split : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या काही आमदारांना ‘अजून काय पाहिजे?’, असा सवाल केला होता. रोहित पवारांनी राष्ट्रवादीत असताना त्यांना मिळालेल्या सत्तेचा लाभाचा लेखाजोखाच मांडला. यात आंबेगावचे आमदार आणि बंडापूर्वी शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे-पाटलांचाही समावेश आहे. याच पोस्टवरून दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांना उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात भाष्य केलं. मंचर येथे झालेल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टचा उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांची भेट झाली तेव्हा आपण त्यांना आमदारकी सोडण्याची ऑफरही दिली, असंही वळसे-पाटील म्हणाले.
रोहित पवारांची पोस्ट जिव्हारी, वळसे-पाटलांनी काढलं ‘वय’
अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यानंतर शरद पवारांचं वय काढलं. त्यांच्यापाठोपाठ आता दिलीप वळसे-पाटलांनीही रोहित पवारांचं वय काढलं. ते म्हणाले, “अजून त्यांचं (रोहित पवार) वय लहान आहे. सार्वजनिक जीवनात येऊन 40 वर्ष झाली. त्यांचं (रोहित पवार) आजच वय 37 वर्षांचं आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, तुम्हाला आणखी काय काय द्यायला पाहिजे.”
वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’
याच मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, “साहेबांनी (शरद पवार) सगळं दिलं. काही कमी पडू दिलं नाही. जीवनाच्या अंतापर्यंत आम्ही त्यांचे कृतज्ञ राहू. पण, ज्यावेळी जातो म्हटल्यानंतर एकदा त्यांची (रोहित पवार) आणि माझी भेट झाली. मी म्हटलं रोहित मतदारसंघाचाच प्रश्न जर असेल, तुम्हाला माझी एक विनंती आहे की पाहिजे तर मी आमदारकी सोडतो. तुम्ही आंबेगावला उभे रहा. पण, हे काम करू नका. याच्याशिवाय दुसरं कुठलंही भांडण माझं साहेबांशी (शरद पवार) किंवा साहेबांच्या कुटुंबाशी नाही”, असं उत्तर वळसे-पाटील यांनी दिलं.
55 पैकी 40 आमदारांनी निर्णय घेतला
केंद्रीय यंत्रणांच्या भीतीमुळे आमदार अजित पवारांच्या गटात गेल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय. त्यावरही वळसे पाटील बोलले. ते म्हणाले, “55 पैकी 40 आमदार ज्यावेळी हा निर्णय घेतात, त्याला काहीतरी कारण असेल आणि मग चर्चा अशी पुढे यायला लागली की, ज्याच्या ज्याच्यावर ईडीची नोटीस आहे किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आहे. त्या लोकांनी घाबरून जाऊन स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय केला. आता तो प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. तो कोर्टात आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलू इच्छित नाही.”
वाचा >> Pradeep kurulkar : ‘झारा’ला सांगितलं ब्रह्मोसचं ‘सीक्रेट’, बाईच्या नादात…
“तुमचा आमदार म्हणून मी या आंबेगाव तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की दिलीप वळसे-पाटलांवर ईडीची कोणतीही नोटीस नाही. कुठलीही सीबीआयची नोटीस नाही. इन्कम टॅक्सची नोटीस नाही. त्यामुळे काहीतरी स्वतःचं वैयक्तिक करण्याच्या दृष्टिकोनातून नाहीतर समाजासाठी हा निर्णय घेतला”, अशी भूमिका वळसे-पाटलांनी मांडली.
रोहित पवारांनी काय केली होती पोस्ट?
बंडानंतर रोहित पवारांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “वळसे-पाटील साहेब, पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो!”
“प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?”, असा सवाल रोहित पवारांनी केला होता.
ADVERTISEMENT