Politics of Maharashtra : 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि 5 जुलै रोजी यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं. अजित पवार शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून अजित पवार गटाने बुधवारी बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केलं. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी अनेक खुलासे केले. हे बोलताना अजित पवार म्हणाले भाजपसोबत जाण्याबद्दल 2019 मध्ये एका उद्योगपतीच्या घरी 5 बैठका झाल्या. अजित पवारांच्या याच विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आता हे उद्योगपती कोण अशी चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार गटाने मुंबईतील एमईटी येथे शक्तिप्रदर्शन केलं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वाय बी चव्हाण सेंटरमध्ये हा बैठक घेतली. अजित पवारांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना शरद पवारांचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्या सगळ्या भाषणात शरद पवारच केंद्रस्थानी होते.
भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुप्त बैठका
मला व्हिलन ठरवण्याचे काम का केलं, असा सवाल अजित पवारांनी केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत घरोबा करण्यासाठी झालेल्या गुप्त बैठकांचा पाढाच वाचला. यावेळी अजित पवारांनी २०१९ मध्ये उद्योगपतींच्या घरी झालेल्या बैठकांचा उल्लेख केला. यावरून मात्र राजकारणात ते उद्योगपती अशी चर्चा सुरू झालीये… याबद्दल बोलण्याआधी अजित पवार नेमकं काय म्हटले ते आपण पाहुया…
वाचा >> NCP: अजितदादांचं बंड, पवारांसोबत सावली सारखे राहणाऱ्या रोहित पवारांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी!
“2019 मध्ये 5 बैठका एका उद्योगपतीच्या घरी झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना कुठेही बोलायचे नाही, असे सांगितले. पहाटेच्या शपथविधीला काय झाले, हे मला अनेकदा विचारले गेले. हे सर्व सुरू असताना मला शिवसेनेसोबत जायला सांगितलं. 2017 मध्ये शिवसेना नको असं म्हणत होते, मग अचानक 2 वर्षात असे काय बदलले? नेहमी वेगवेगळी भूमिका असं चालत नाही”, असं अजित पवार म्हणाले होते.
शरद पवार उद्योगपतीची भेट
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट भाजपसोबत सरकारमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे समोर आलं होतं. ही चर्चा सुरू असतानाच शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी बंगल्यावर एका उद्योपतींनी स्वत: येऊन भेट घेतली. याच भेटीने सस्पेन्स निर्माण झाला होता. यानंतर 5 जुलैच्या भाषणात अजित पवारांकडून उद्योगपतींचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्यात.
वाचा >> ना अजित पवारांकडे गेले ना शरद पवारांकडे? राष्ट्रवादीचे ते 6 आमदार कोण?
आणखी गोष्ट सांगायची म्हणजे शरद पवारांचे त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच उद्योगपतींशी चांगले संबंध राहिले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावालापासून ते रतन टाटांपर्यंत असलेले शरद पवारांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यांच्या आत्मचरित्रातही राहुल बजाज ते गौतम अदाणी यांच्याबद्दल लिहिलेलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात एका उद्योगपतींचं कौतुक केलेला मुद्दा चर्चेत आला होता. या सगळ्या गोष्टी पाहता २०१९ च्या विधानसभेच्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतींच्या घरी 5 बैठका झाल्या असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यावर तो उद्योगपती कोण असा प्रश्न निर्माण झालाय.
ADVERTISEMENT