Raj Thackeray : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनाही निवडणुकींच्या कामासाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. हजारो शिक्षकांना तसे आदेश देण्यात आले असून, हजर न राहिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. शिक्षकांनी हजर होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कोण कारवाई करतो, हे बघतोच असंही ते म्हणालेत.
ADVERTISEMENT
राज ठाकरे म्हणाले, "शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी माझी भेट घेतली. त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आहे. पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी सरकार, निवडणूक आयोग आणि महापालिकेने बोलवून घेतलं आहे. किती काळासाठी, किती वेळेसाटी याच्या काही मर्यादा नाही.
"हे शिक्षण काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिक्षक कोण आहेत, याची कोणतीच व्यवस्था नाही. साधारणपणे मुंबई महापालिका हद्दीत 4 हजार 136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येतं आहे. मग त्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण आहेत. निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो?", असा प्रश्न राज ठाकरेंनी केला.
"असे लोक निवडणूक आयोग तयार का करत नाही. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या पत्रात म्हटलं आहे की, हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. म्हणजे या शिक्षकांवर सरकार कारवाई करणार. मग निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का नाही करत?", असंही राज ठाकरे म्हणाले.
"शिक्षक हे निवडणुकीच्या कामासाठी आले आहेत का? शिक्षण हे मुलांना शिकवण्यासाठी आले आहेत. मी पक्षांच्या नेत्यांसोबत बोलेन. आमची लोक निवडणूकाची वेळ घेतील. त्यानंतर मी बोलेन, पण माझी शिक्षकांना विनंती असेल की, कुठेही तुम्ही रूजू होऊ नका. विद्यार्थ्यांवर लक्ष द्या. मला बघायचंच आहे की, कोण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतं ते", असं राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT