Rohit Pawar Devendra Fadnavis Maratha Reservation : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सुप्त संघर्ष बघायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील तिसऱ्या टप्प्यातील दौरा करणार आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसींचं शक्तिप्रदर्शन करणार आहे. या संघर्षाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक स्फोटक विधान केलं आहे. राज्यात दिसत असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा वादावर बोलताना रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी काही समाजकंटकांनी बीड शहर आणि जिल्ह्यात जाळपोळ, दगडफेक केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचं बीडमधील कार्यालयही जाळण्यात आलं. या कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आली. त्याचं उद्घाटन रोहित पवारांच्या हस्ते झालं. दिवाळी पाडव्यानिमित्त रोहित पवारांनी इथेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
हे ही वाचा >> CM शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर? रामदास कदमांनी सांगून टाकलं
रोहित पवार पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “दिवाळी पाडव्यानिमित्त प्रथमच पवार कुटुंबातील एका व्यक्तीला अशा पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी पाडवा साजरा करावा लागत आहे. परंतु मी संदीप क्षीरसागर यांना शब्द दिला होता. त्यानुसार मी कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहे. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्मण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत.”
रोहित पवारांनी व्यक्त केला संशय
जाळपोळीच्या घटनेबद्दल रोहित पवार म्हणाले, “बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जो प्रकार घडला, त्यावेळी पोलीस हातावर हात ठेवून होते. अगदी साधा सायरन देखील त्यांनी वाजवला नाही. यामुळे यामागे जे लोक सहभागी आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याची चर्चा सर्वसामान्य मध्ये आहे. आम्हाला देखील तसाच संशय आहे”, असं रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादी भवन हे मुद्दामहून लक्ष केले गेले असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.
फडणवीसांवर रोहित पवारांनी काय केला आरोप
“सत्तेत असणारे नेतेच जर सभा घेऊन तिथे मुद्दा मांडत असतील, तर हे कितपत योग्य आहे? तुमच्याकडे सत्ता कशासाठी आहे? मार्ग काढण्यासाठीच ना. त्याच्यासाठी तुम्ही बसा… तुमचेच नेते आहेत. आता फडणवीस मुद्दामहून काही लोकांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत का? हाही प्रश्न आहेच. तुम्ही सत्तेत असताना सभा घेत असाल, सत्तेचा वापर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी करत नसाल, तर याला काय समजायचं?”, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांच्या आगामी सभेचा उल्लेख न करता केला.
छगन भुजबळांचा ओबीसी मेळावा
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीली छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या, अशी मागणी भुजबळांनी सरकारकडे केली आहे. भुजबळ राज्यातील शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
हे ही वाचा >> ‘जात यावर मी कधीही राजकारण केलं नाही, पण…’, ‘त्या’ दाखल्यावर पवारांचं मोठं विधान
भुजबळांकडूनच मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध होत असल्याने सरकारमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. त्यात आता भुजबळांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी मेळावा होणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी हा मेळावा होणार असून, यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष बघायला मिळू लागला आहे.
ADVERTISEMENT