Subrata Roy News : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी (१४ नोव्हेंबर) निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारणही समोर आले आहे. (Subrata Roy passes away)
ADVERTISEMENT
सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो रॉय हे दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (१५ नोव्हेंबर) त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, तिथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
हे ही वाचा >> रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान
सुब्रतो रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला होता. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.
समाजवादी पक्षाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्री सुब्रतो रॉय यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शोकभावना समाजवादी पक्षाने व्यक्त केल्या आहेत.
सुब्रतो रॉय यांच्या निधनाबद्दल शोक
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुब्रतो रॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, “सहाराश्री सुब्रतो रॉयजी, यांचे निधन हे उत्तर प्रदेश आणि देशाचे भावनिक नुकसान आहे कारण ते एक अतिशय यशस्वी उद्योजक होते. तसेच खूप संवेदनशील आणि मोठ्या मनाचे व्यक्ती होते, ज्यांनी असंख्य लोकांना मदत केली आणि त्यांचे आधार बनले. भावपूर्ण श्रद्धांजली.”
सुब्रतो रॉय यांच्या मृत्यूचे कारण काय?
सुब्रतो रॉय यांच्या निधनाबद्दल सहारा समूहाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सहारा इंडिया परिवारचे प्रमुख सुब्रतो रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री 10.30 वाजता कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रासले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती, त्यामुळे त्यांना 12 नोव्हेंबर रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहाराश्रींच्या निधनाने सहारा इंडिया परिवार शोकाकूल आहे.
हे ही वाचा >> CM शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर? रामदास कदमांनी सांगून टाकलं
सुब्रतो रॉय जामिनावर होते बाहेर
अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच, त्याच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
सुब्रतो रॉय यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते जामिनावर बाहेर होते. त्याच वेळी, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत सहारा इंडियाचा दावा आहे की त्यांनी संपूर्ण रक्कम सेबीकडे जमा केली आहे.
ADVERTISEMENT