राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असलेल्या घडामोडींबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून भाष्य करत आहे. शरद पवारांनी राजीनामा घेतल्यानंतर अग्रलेखातून स्फोटक भाष्य करण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर उमटला होता. आता या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते लिहितील, त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. त्याचं महत्त्व आमच्या दृष्टीने काही नाही, असं म्हणत पवारांनी विषयच संपवला. पवार नेमकं काय म्हणाले, ते पाहूयात…
ADVERTISEMENT
पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर सामना अग्रलेखात म्हटलं गेलं की, “पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.”
सामनातील अग्रलेखाला शरद पवारांचं उत्तर…
अग्रलेखातून जे भाष्य करण्यात आलं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “आम्ही काय केलं, हे त्यांना माहिती नाही. कारण आमचं एक वैशिष्ट आहे की, आम्ही पक्षाचे सगळे सहकारी आहोत, अनेक गोष्टी बोलतो. वेगवेगळी मतं येतात पण ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नाही. हा आमचा घरातला प्रश्न असतो. आणि घरामध्ये आमच्यातल्या सहकाऱ्यांना ठावूक आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. पुढे नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते, याची खात्री पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे.”
हेही वाचा >> अजितदादा नाही तर सुप्रिया सुळेंमुळे शरद पवारांनी राजीनामा घेतला मागे?
शरद पवारांनी सामना अग्रलेखाचा उदाहरण देत समाचार घेतला. ते म्हणाले, “एक साधं उदाहरण सांगतो की, 1999 साली ज्यावेळी आम्ही लोक राज्यात सत्तेत आलो. त्यावेळी काँग्रेस आणि आमचं संयुक्त मंत्रिमंडळ तयार करायचं होतं. त्यावेळी नव्या मंत्रिमंडळात ज्या सहकाऱ्यांना आम्ही सहकाऱ्यांना आम्ही सहभागी करून घेतलं, त्यामध्ये जयंतराव पाटील होते, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, आर.आर. पाटील होते. अशी अनेक नावं आहेत, ज्यांच्या आयुष्यात पहिला सत्तेचा हा काळ होता.”
आम्ही दुर्लक्ष करतो; पवारांनी काय सांगितलं?
“मी मंत्रिमंडळात होतो, पण माझी सुरूवात राज्यमंत्री म्हणून झाली. राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळालं. पण, आता जी नावं मी घेतली, ते सगळे कॅबिनेट मंत्री म्हणून आम्ही त्यांची नियुक्ती केली. महाराष्ट्राने बघितलं की, त्या प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तृत्व दाखवलं. त्यामुळे आम्ही तयार करतो किंवा करत नाही, हे कुणी लिहिलं त्याचं महत्त्व आमच्या दृष्टीने काही नाही. ते लिहितील, त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आम्हाला ठावूक आहे की, आम्ही काय करतो. त्याच्यात आम्हाला समाधान आहे”, असं सांगत पवारांनी विषय संपवला.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचा उल्लेख, शिव्यांवरून मोदींवर घणाघात; शरद पवार काय बोलले?
महाविकास आघाडी एकसंघ -शरद पवार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे मविआमध्ये विसंवाद असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यावर पवार म्हणाले, “त्याचा काही परिणाम याच्यावर होणार नाही. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात, धोरणात प्रत्येकांची एक भूमिका सहकारी पक्षाबरोबर शंभर टक्के असेल, असं कधी होत नाही. काही गोष्टी पुढे मागे होत असतात. वेगळी मतं असतात. धोरण असतात. पण, त्याच्यात आमचा कुणाचा काही गैरसमज नाही.”
ADVERTISEMENT