Sharad Pawar Speech in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला. त्याचबरोबर इतिहासाला उजाळा दिला. यावेळी बोलताना पवारांनी पत्रकारिता स्वतंत्र असायला हवी म्हणत माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, देशात पुणे शहराचं वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे. शिवाजी महाराजांचा जन्म याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. याच शहरातील लाल महलात त्यांचं बालपण गेलं. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.”
शरद पवारांनी सांगितलं हिंदवी स्वराज्याचं महत्त्व
पवार पुढे बोलताना म्हणाले, “या देशात अनेक राजे, राजवाडे होऊन गेले. त्यांचं राज्य त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचं. देवगिरीचं यादवांचं संस्थान असेल, मोगलांचं दिल्लीचं संस्थान. अनेकांची संस्थान या देशात होऊन गेली. पण, शिवछत्रपतींचं काम वेगळ्या दिशेने झालं. त्यांनी राज्य उभं केलं, पण ते भोसल्यांचं राज्य नव्हते. ते हिंदवी स्वराज्य होतं. ते रयतेचं राज्य होतं. त्यांचं रयतेचं राज्य प्रस्थापित करण्यासंबंधीचं काम या पुणे शहरात झाला. हा पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे.”
वाचा >> Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?
“अलिकडेच्या काळात या देशाने आणि देशाच्या जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते, पण लाल महलात शाहिस्ते खानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही”, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना चिमटा काढला.
वाचा >> ‘साहेब आणि दादा आजही एकत्रच’, अजित पवारांचं शरद पवारांबद्दल भुवया उंचावणारं विधान
“अनेक गोष्टी इथे सांगता येतील. आपण लोकमान्यांचं स्मरण करण्यासाठी आलो. 1865 रोजी लोकमान्यांचे वडील गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली आणि पुण्यात आले. त्यानंतर ते आगमन नव्हतं, तर एक चिंगारी होती. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्यासंबंधी मशाल बनली होती. त्या कालखंडात लोकमान्यांचा सुरुवातीचा काळ या पुणे शहरात गेला”, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
“त्यांचं एकदर लक्ष या परिस्थितीवर होतं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल, तर सामान्य माणसाला जागृत केलं पाहिजे. त्यासाठी जबरदस्त शस्त्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हे शस्त्र म्हणजे पत्रकारिता. टिळकांनी 25व्या वर्षी मराठी भाषेत केसरी वर्तमानपत्र आणि इंग्रजीमध्ये मराठा साप्ताहिक सुरू केलं.”
पत्रकारितेवर दबाव असू नये -शरद पवार
“या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध कडा प्रहार केला. केसरीचा अर्थ सिंह असा आहे. केसरी आणि मराठाच्या माध्यमातून टिळकांनी परकीय लोकांवर प्रचंड प्रहार केला आणि एक प्रकारची जागृती करण्याचं काम त्यांनी केलं. ते नेहमी म्हणत पत्रकारितेवर कुणाचा दबाब असता कामा नये. त्या दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे. ती भूमिका त्यांनी सातत्याने पाळली”, असे सांगत पवारांनी माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला.
काँग्रेसचा जन्म पुण्यात झाला
“1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला. या पुणे शहरात झाला. त्या काळात पहिलं अधिवेशन पुण्यात होणार होतं, पण प्लेगची साथ आली. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत झालं. ज्याठिकाणी हे झालं, त्याठिकाणाला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखलं जातं”, असं शरद पवार म्हणाले.
“त्याकाळात एकदंर दोन प्रकारचे नेते त्या संघटनेत होते. त्यांना मवाळ आणि जहाल म्हणून ओळखलं जायचं. जहालांचं प्रतिनिधित्व लोकमान्यांनी केलं. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका जनमाणसासमोर मांडली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसुत्री त्याच्या माध्यमातून स्वराज्याचं आंदोलन सुरु केलं”, अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.
वाचा >> Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेता ठरला! काँग्रेसने नावावर केले शिक्कामोर्तब
“त्याकाळात दोन युगे होती. एक टिळक आणि दुसरं गांधी युग. या दोघांचं योगदान आम्ही विसरू शकत नाही. या देशाच्या नव्या पिढीला कर्तृत्वान दृष्टीच्या नेत्यांचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल, याची मला खात्री आहे. पुरस्कारासाठी मोदींची निवड केली. याचा आनंद आपल्या सर्वांना आहे. त्यांचं अभिनंदन करतो”, असं शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
