Sharad Pawar-Narendra Modi, Palestine and Israel Conflict : शरद पवारांनी पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षावर मांडलेल्या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेने शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आयते शस्त्र मिळालं. मोदींच्या भूमिकेवर बोट ठेवत शरद पवारांनी टिका केलेल्या भाजप नेत्यांचे शेलक्या शब्दात कान टोचले.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विधानाचा समाचार घेतला. पवार नेमकं काय बोलले, वाचा…
भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार काय बोलले?
शरद पवारांनी म्हटलं आहे की,”गेल्या काही दिवसांपासून X (आधीचे ट्विटर) व टीव्ही बाईट्द्वारे काही सल्ला आणि टिप्पण्या देण्यात आल्या. सदर टिप्पण्या माझ्या विधानाचा सखोल विचार न करता केलेल्या आहेत”, असं सांगत पवारांनी नितीन गडकरींपासून हिमंत बिस्वा सरमापर्यंत भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांचा उल्लेख केला आहे.
कोणता भाजप नेता काय म्हणाला? पवारांनी ट्विट केली विधानं…
नितीन गडकरी – शरद पवारजी हे जाणतात की, ते एका विशिष्ट वर्गाला संतुष्ट करणारे विधान करत आहेत… त्यांचा संरचनात्मक दृष्टीकोन हवा.
पीयूष गोयल – ही कुजलेली मानसिकता थांबली पाहिजे. मला आशा आहे की, पवारजी आता तरी आधी देशाचा विचार करतील.
हे ही वाचा >> Richard Kettleborough : कोहलीच्या शतकासाठी दिला नाही वाइड बॉल, नियम की फिक्सिंग?
देवेंद्र फडणवीस – शरद पवारजी यांना माझी विनंती आहे की, त्यांनी मताच्या राजकारणाचा विचार करू नये, तर त्याचा तीव्र निषेध करावा.
हिमंत बिस्वा सरमा – मला वाटते शरद पवार हे सुप्रिया (सुळे) यांना हमासकरिता लढण्यासाठी गाझाला पाठवतील.
या विधानांचा उल्लेख करत शरद पवार पुढे म्हणाले आहेत की, या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांनी X (आधीचे ट्विटर) द्वारे पॅलेस्टाईन मुद्द्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करतो”, असं म्हणत पवारांनी मोदींच्या भूमिकेचाही उल्लेख केला आहे.
पंतप्रधान मोदींची पॅलेस्टाईन इस्रायलबद्दल भूमिका
नरेंद्र मोदी – “पॅलेस्टाईन राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा करून गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये नागरिकांच्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. आम्ही पॅलेस्टिनी लोकांसाठी मानवतावादी मदत पाठवत राहू. पॅलेस्टाईन प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थितीबाबत तीव्र चिंता वाटते. एकूणच इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन तत्वनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि त्यावरील ठरावांचे समर्थन केले.”
शरद पवारांनी भाजप नेत्यांना सुनावले खडेबोल
मोदींच्या भूमिकेचा हवाला देत पुढे शरद पवारांनी म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्या विधानापूर्वी जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंतच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेशी सुसंगत असेच विचार मी व्यक्त केले होते. इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोक राहत असलेल्या भागातील दीर्घकालीन वादावर तोडगा निघून शांतता आणि सौहार्द प्रस्थापित व्हावे हेच त्यातून सांगावयाचे होते. मोदीजींनी तेच अधोरेखित केले याबद्दल धन्यवाद.”
हे ही वाचा >> ‘पवार गट-उबाठा यांना लाजा वाटत नाहीत?’, फडणवीस संतापले; नंतर केली मोठी घोषणा
“मला आशा आहे की, माझ्या विधानाचा विपर्यास करणाऱ्या काही भाजपा नेत्यांना अशा संवेदनशील विषयावर राष्ट्राची भूमिका ध्यानात येईल. राजापेक्षा अधिक निष्ठावंत अशी इंग्रजी म्हण प्रचलित आहे. ह्या टिप्पण्या त्याच धांदलीचा एक भाग आहेत”, असं म्हणत शरद पवारांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT