कल्याण: कल्याणच्या पत्रिपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या घटनेने कल्याण डोंबिवलीसह सर्वच जण हळहळले. ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठण्याच्या प्रयत्नात अवघ्या सहा महिन्यांचे बाळ हातून निसटले आणि नाल्यात पडून वाहून गेले. कल्याणच्या पत्री पुलाजवळ आज (19 जुलै) दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वानाच मोठा धक्का बसला. (six month old baby fell from railway track directly into drain kalyan thakurli messages going viral that baby survived by ndrf team know what is the real truth)
ADVERTISEMENT
नेमकी घटना कशी घडली?
आज सकाळपासून कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान एका मागोमाग एक लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ होऊनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अखेर त्यातील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे अंबरनाथ लोकलमधील काही प्रवासी देखील गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालू लागले. ज्यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुकल्या ऋषिका हिला घेऊन तिचे आजोबा आणि तिची आई योगिता शंकर (वय 25 वर्ष) बाळाची आईही होती.
त्यावेळी पत्री पुलाजवळ कल्याण दिशेकडील स्लो ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलच्या डाव्या बाजूने हे कुटुंब जात असताना ही दुर्घटना घडली. ही लोकल उभी असलेल्या ट्रॅकच्या खालून एक नाला वाहत होता आणि तो पार करण्यासाठी लोकलच्या डाव्या बाजूने अगदी अरुंद अशी जागा होती. त्या अरुंद जागेतून ऋषिकाला घेऊन चालताना योगिताचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यामुळे तिने आजोबांना ऋषिकाला आपल्याकडे घेण्यास सांगितलं. त्यामुळे आजोबांनी ऋषिकाला आपल्या हातात घेत योगिताला देखील उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी हातून ऋषिका निसटली आणि ती थेट नाल्याच्या पाण्यात पडली. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजात त्यावेळी धस्स झालं. तिथे असणाऱ्या काही मुलांनी त्या नाल्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काहीशी शोधाशोध केली. परंतू त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही.
हे ही वाचा >> Kalyan: हृदयद्रावक… लोकलमधून उतरताना 6 महिन्याचं बाळ हातातून निसटलं, नाल्यात गेलं वाहून
मिळालेल्या माहितीनुसार, योगिता ही आज आपल्या सासऱ्यांसोबत सहा महिन्यांच्या ऋषिकाला घेऊन KEM रुग्णालयात गेली होती. तिकडून ती कल्याणला परतत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
काळीज कातरणारा आईचा आक्रोश…
आपल्या पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच ती योगिता ही धाय मोकलून रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ती अक्षरशः त्या नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. तर हा सगळा प्रसंग घडत असताना तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूंचा बांध फुटला. त्या आईच्या आर्त किंकाळीने सर्वांचेच काळीज अक्षरशः पिळवटून टाकले.
‘ते’ बाळ खरंच वाचलं?
दरम्यान, लोकलमधून उतरताना एका महिलेच्या हातून तिचं बाळ निसटून थेट नाल्यातून वाहून गेल्याचं वृत्त प्रचंड व्हायरल झालं. कारण प्रत्यक्षदर्शींपैकी काही जणांनी हा प्रकार ट्रेनमधून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. ज्याचा व्हिडीओ हा अवघ्या काही मिनिटात प्रचंड व्हायरल झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याने प्रत्येकाने याबाबत हळहळ व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच अचानक सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशी माहिती व्हायरल झाली की, कल्याणजवळ नाल्यात पडलेलं बाळ हे सापडलं आहे. त्याला एनडीआरएफने वाचवलं आहे. अशा मेसेजसह एक फोटो देखील व्हायरल झाला. ज्यामध्ये एनडीआरएफच्या टीमने एका बाळाला हातात घेतलं असल्याचं पाहायला मिळत होतं. या फोटोमुळे अनेकांचा असा समज झाला की, कल्याणमध्ये वाहून गेलेलं ते बाळ सुखरुपपणे वाचलं.
हे ही वाचा >> Rain Update: मुंबई, ठाण्यात तुफान पाऊस, लोकल ट्रेन ठप्प.. पाहा LIVE Update
पण दुर्दैवाने असं घडलेलं नाही. कारण व्हायरल केला जाणारा फोटो हा साधारण वर्षभरापूर्वीचा आहे. जो मागील वर्षीचा पोलादपूरमधील असल्याचं समजतं आहे. पुरामधून एनडीआरएफने एका बाळाला वाचवलं होतं तो फोटो आता पुन्हा व्हायरल झाला.
दरम्यान याबाबत मुंबई Tak च्या प्रतिनिधीने डोंबिवली लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरक्षिक अर्चना दुसाने यांच्याशी याबाबत संपर्क साधून माहिती मिळविली. याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, दुर्दैवाने बाळ वाहून गेले आहे. जे अद्याप सापडू शकलेले नाही. मात्र शोध सुरु आहे. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिक कोळी बांधव, अग्निशमन दलाकडून बाळाचा कसून शोध घेतला जात आहे. तर काही तरी चमत्कार व्हावा आणि हे बाळ सुखरूप मिळावे अशी सर्वच जण प्रार्थना करीत आहेत.
ADVERTISEMENT