Uddhav Thackeray on Nanded Hospital Deaths: “मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजले आहेत. ते बघून संताप येतोय”, अशा भावना उद्धव ठाकरेंनी राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंबद्दल व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT
शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “जेव्हा जगभरात करोनाचं संकट होतं. तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाराष्ट्रात तीच आरोग्य यंत्रणा आहे. ज्या आरोग्य यंत्रणेने ज्या साथीचा यशस्वी सामना केला. त्याच महाराष्ट्राची दुर्दशा सरकार बदलल्यानंतर चव्हाट्यावर आलीये. हेच डॉक्टर होते. नर्स तेच होते. त्यांनी जीवाची बाजू लावून रुग्णसेवा केली”, भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
एक फुल दोन हाफ… ठाकरे काय बोलले?
“माझ्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य होतं की, ड्रोनने औषधी पुरवली होती. नंदूरबारमधील टोकाच्या गावात लस पुरवल्या होत्या. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका योद्ध्यासारखे लढले, पण त्यांना आता बदनाम केलं जात आहे. कळवा, नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयाच्या बातम्या येताहेत. याला जबाबदार कोण? कुणीच जबाबदारी घेत नाहीये. एक फुल दोन हाफ कुठे आहेत?”, अशा शब्दात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं.
हेही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
उद्धव ठाकरे म्हणाले की, “रुग्णालयात बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. मुख्यमंत्र्यांचं आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की, कारण शोधायला पाहिजे होतं. नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलाय. पण, फक्त एकाच डीनवर गुन्हा दाखल का झाला? कळवा, नागपूर, संभाजीनगरमध्येही बळी गेलेत.”
धमकावण्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, ठाकरेंनी कोणती शंका उपस्थित केली?
“ज्या डीनला एका मस्तवाल खासदाराने संडास साफ करायला लावला. आदिवासी आहेत, असं ते म्हणतात. मी कधीच जातपात बघत नाही. त्या गद्दारावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला म्हणून धमकावण्यासाठी त्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय का?”, असा नवा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप
“औषधांचा तुटवडा राज्यभर आहे. मंत्री म्हणताहेत औषधी मुबलक आहे, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे. चंद्रपूरमधील एक महिला सांगतेय की, बाहेरून औषधी आणायला सांगितले जात आहे. मग पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आहे. कोरोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आता साथ आहे, ती भ्रष्टाचाराची आहे. आरोग्य खात्यात पोस्टसाठी रेटकार्ड ठरलं आहे”, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी आरोग्य खात्याबद्दल केला.
खेकड्यांच्या हातात कारभार… ठाकरेंचा तानाजी सावंताना टोला
“औषधी खरेदी निविदा प्रक्रियेशिवाय खरेदी करणार आहे. मग, तुम्ही भ्रष्टचाराला दार उघडं करू देत आहात. जिकडे औषधी पोहोचलेली नाहीये, तिकडे कुणाचे दलाल पोहोचले आहेत, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. युतीचं सरकार असताना खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. अशा खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का?”, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला केला.
हेही वाचा >> ‘तुम्हाला पळ काढता येणार नाही’, मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला झापलं
“हे सरकार यमाचं दरबार आहे. यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करण्यासाठी पैसे आहेत. गुवाहाटी, सुरत, गोव्यात जाऊन नाचायला यांच्याकडे पैसे आहेत. पण, जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत. यांची निपक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे. एक फुल दोन हाफमधील दुसरे हाफ उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्यात होते. विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी कोर्टाने मारलेले ताशेरे बोलून दाखवले होते. ते म्हणजे हे सरकार नपुंसक आहे. हे सरकार कसं आहे, हे सर्वोच्च न्यायालयाही कळलं आहे. या सरकारमुळे लोकांचे बळी जात आहे. जनतेने आता जागं झालं पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी लोकांना केलं.
पेशंट टेबलवर आणि डॉक्टर दौऱ्यावर
“माणुसकीला सोडून कारभार चालला आहे. पालकमंत्रीपदासाठी मंत्री रुसलेले आहे. पेशंट टेबलवर आणि डॉक्टर दौऱ्यावर अशी परिस्थिती राज्यात आहे. गेल्या चार पाच दिवसांत जे बळी गेले आहेत, त्याला एक कारण म्हणजे सलग सुट्टया. सलग सुट्ट्यांच्या काळात डॉक्टरांच्या ड्युट्या लावून दिल्या जातात. सुट्टीच्या काळात त्या लावल्या गेल्या होत्या का?”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
ADVERTISEMENT