Uddhav Thackeray’s Shiv Sena Bjp Mla Ganpat Gaikwad Eknath Shinde : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, शिंदे आणि महायुती सरकारला लक्ष्य करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट मुख्यमंत्री शिंदेंना अटक करण्याची मागणी केलीये.
ADVERTISEMENT
‘गुंडांचे राज्य! मुख्यमंत्र्यांना अटक करा!’, या मथळ्याखालील अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाला आहे. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारासह राज्यात यापूर्वी घडलेल्या घटनांची यादी वाचून दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारला धारेवर धरल्याचे दिसत आहे. वाचा सामना अग्रलेखात नेमकं काय केलंय भाष्य?
शिवसेनेने UBT सामनात काय म्हटलंय?
“पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे, पोलीसप्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश, बिहारात अनेकदा घडते. आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले व या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत.”
हेही वाचा >> गोळ्या झाडणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलासोबत काय घडलं, पहा Video
“शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल, असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेले आहेत. उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले. स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले व हळहळले.”
अमित शाह-मोदींवर टीकास्त्र
“मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले हे गँगवॉर संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान मोदी यांनीही पाहिलेच असेल. इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापि प्रतिक्रिया नाही. बिगर भाजपशासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येते, पण महाराष्ट्रात शाह-मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी, रक्तपात सुरू आहे. त्यावर हे ‘संस्कार भारती’ तोंड उघडायला तयार नाहीत.”
“आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केले’, असे आमदार गायकवाड यांनी सांगितले. पोलिसांनी गायकवाड यांचा हा कबुलीजबाब गांभीर्याने घ्यायला हवा. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या बाळराजांनी ठाणे-कल्याणसह संपूर्ण राज्यात गुंडगिरीचा धुडगूस घातला आहे.”
हेही वाचा >> ‘कुणाच्या बापाचं ऐकणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा
“ठेकेदारी, अपहरण, खंडणी, धमक्या, हत्या, जमिनींचा कब्जा घेणे असे गुन्हे सरकारी आशीर्वादाने घडत आहेत व आपल्या गँगच्या लोकांना या कामात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक केली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे व त्यास दिल्लीचा खुला आशीर्वाद आहे.”
‘अजित पवार गँग-शिंदे गँग’, ठाकरे गटाने दिली घटनांची यादी
“राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव आणि अॅड. मनीषा राजाराम आढाव या वकील दांपत्याचे अपहरण करून त्यांचा अमानुष खून करण्यात आला. राज्यभरातील वकील आढाव यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न केले.”
“नगर जिल्ह्यात आमदार संग्राम जगताप यांच्या झुंडशाहीने अघोरी टोक गाठले आहे. जगतापांच्या टोळीतले लोक खून, अपहरण, संपत्तीचा अवैध कब्जा वगैरे प्रकरणांत गुंतले आहेत. सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजकांना तेथे जगणे कठीण झाले. जगताप हे अजित पवार गँगचे सदस्य आहेत.”
“शिंदे गँगचे प्रकाश सुर्वे हे जाहीरपणे लोकांचे हातपाय तोडण्याची भाषा करतात, त्यांचे पुत्र बिल्डरांच्या कार्यालयात घुसून धमक्या देतात. आणखी एक गँग मेंबर सदामामा सरवणकर हे जाहीरपणे पिस्तुलांचे बार उडवतात व सरकारचे मिंधे पोलीस त्यांना पाठीशी घालतात.”
हेही वाचा >> 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला
“पुण्यनगरीत तर अजितदादांच्या कृपेने जे घडते आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेशरमपणाचे लक्षण आहे. पार्थ पवार यांनी कुख्यात गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व ‘विचारांची देवाणघेवाण’ केली. गेल्या चार महिन्यांत पुण्यातील अनेक खतरनाक गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला.”
“कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील पाच जणांच्या बाबतीत आरोपपत्र दाखल करण्यास जाणूनबुजून विलंब केला गेला. त्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला. हे चित्र चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरूच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंडांचेच राज्य असून ‘सागर’ आणि ‘वर्षा’ बंगल्यावर त्यांचे ‘बॉस’ आहेत, असे सत्ताधारी पक्षाचेच आमदार जाहीरपणे सांगतात. तेव्हा कायद्याचे राज्य येणार कोठून?”
“जे राज्य गुंड व झुंडशाहीतून निर्माण झाले, त्या राज्यात यापेक्षा वेगळे काय घडणार? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कोकणातील सभा उधळून लावू अशा धमक्या भाजपचे फुसके बार देतात ते ‘सागर’ बंगल्यात गुंडांचे बॉस बसल्यामुळेच. आमचे कोण काय वाकडे करणार, अशी भाषा हे लोक करतात व ‘सागर’ बंगल्यावरचे ‘बॉस’ त्यावर मूग गिळून गप्प बसतात.”
गणपत गायकवाडांबद्दल ठाकरे गटाने काय म्हटलंय?
“गणपत गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांनी पोसलेल्या गुंडांविरुद्ध पोलीस स्टेशनातच हत्यार उचलावे लागले व गुंडांवर गोळ्या झाडल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत नसल्याचे आमदार गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या मुलावर पोलीस स्टेशनातच हल्ला झाला.”
“हल्लेखोरांना मुख्यमंत्र्यांच्या बाळराजांचे संरक्षण असल्याने पोलीसही मिंधे बनले. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते मारत असतील तर माझा जगून तरी काय फायदा? म्हणून मी आत्मसंरक्षणासाठी हत्यार उचलले असे गायकवाड म्हणतात. या सगळ्या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी ठरवले. हे ढोंग आहे.”
“महाराष्ट्रातील गुंडांचे राज्य मोडून काढण्याची हिंमत त्यांच्यात नाही. कारण मुख्यमंत्री शिंदे हेच गुंडांचे राज्य चालवत आहेत. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत. गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा.”
“ईडीने गायकवाड यांचा जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. कोट्यवधी रुपये गायकवाड यांनी शिंदे यांना का दिले? हे कोट्यवधी रुपये काही सरळ मार्गाने आलेले नाहीत. गुन्हेगारीतून आलेला पैसा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. हे सरळ ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण आहे व त्याबद्दल त्यांना ‘पीएमएलए’ कायद्याने अटकच व्हायला हवी. ‘ईडी’वाल्यांनो, ऐकताय ना? ऐकले असेल तर ‘वर्षा’ बंगल्यावर समन्स पाठवा. तरच कायद्याचे राज्य, नाहीतर महाराष्ट्रात चोरांचे राज्य असून चोरच ते चालवीत आहेत!”
ADVERTISEMENT