Rashmi Shukla : राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एका मुद्द्यावरुन भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला जात होता. त्याचं कारण होतं राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांना मोठा विरोध केला होता. त्यांच्या फोन टॅपींग प्रकरणाचे गंभीर आरोप होते, त्यामुळे त्यांना निवडणुकांच्या काळात पोलीस महासंचालक पदावर ठेवू नका अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता निवडणुका पार पडल्या, महायुतीला बहुमत मिळालं आणि राज्यात महायुतीचं सरकारही स्थापन होईल. मात्र शपथविधीपूर्वीच इकडे रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी बोलावण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
रश्मी शुक्ला या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन ऐकत आहेत असे आरोप संजय राऊत, नाना पटोले यांनी केले होते. मात्र सुरुवातीला निवडणूक आयोगाने हा विषय आमच्या अधिकारात येत नाही असं म्हटल्याचं राऊतांनी सांगितलं होतं. त्यावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. याचवेळी त्यांनी झारखंडच्या पोलीस महासंचालकांची कशी बदली केली हे देखील सांगितलं होतं. राज्यातील पोलीस दबावात काम करतायत, आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारी, मकोका लावून निवडणूक हातात घेण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे राज्यात पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवावंच लागेल असं राऊत म्हणाले होते.
हे ही वाचा >>Eknath Shinde : "माझ्या समर्थनार्थ कुणीही...", मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
राज्यातील निवडणूक अशा स्थितीत खऱ्या अर्थाने निष्पक्ष होतील का याचा निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातायत. यांचा दबाव पोलिसांवर आहे असं राऊत म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्या पाठिशी कोण आहे? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं राऊत म्हणाले.
हे ही वाचा >>Assembly Election Results : पवार Vs पवार आणि ठाकरे Vs शिंदे, किती ठिकाणी लढले, किती आमदार पाडले? वाचा सविस्तर
निवडणूक आयोगाने त्यानंतर तातडीने निर्णय घेत रश्मी शुक्ला यांना सक्तिच्या रजेवर पाठवलं होतं. त्यांच्या ऐवजी संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा रश्मी शुक्ला यांना या पदावर कायम केलं जाणार आहे. रश्मी शुक्ला या आज आपला पदभारही स्वीकारणार आहेत.
ADVERTISEMENT