तब्बल 36 दिवसानंतर पंजाब पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आलं. खलिस्तानी समर्थक आणि फरार असलेला अमृतपाल सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालने आत्मसमर्पण केल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, मोगा येथील गुरूद्वारातून अमृतपालला ताब्यात घेतलं आणि बेड्या ठोकल्या, अशी माहिती पंजाब पोलिसांनी ट्विट करून दिली आहे.
ADVERTISEMENT
पंजाब पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “अमृतपाल सिंगला पंजाबमधीलच मोगा येथून अटक करण्यात आली आहे. पुढील माहिती पंजाब पोलिसांकडून नंतर दिली जाईल.” ही माहिती देतानाच पंजाब पोलिसांना आवाहन केलं आहे की, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी अटक का केली? (Why Punjab Police Arrested amritpal singh)
पंजाब पोलीस गेल्या 36 दिवसांपासून अमृतपाल सिंगच्या मागावर होते. अमृतपाल सिंग सर्वात आधी 23 फेब्रुवारी रोजी चर्चेत आला होता. अमृतपालने त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सोडण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. यात 6 पोलीस जखमी झाले होते.
हेही वाचा >> ब्रिटनमधील मुलीशी लग्न, भिंद्रनवाल्याशी तुलना; कोण आहे अमृतपाल सिंग?पंजाब पोलिसांची झोप उडवणारा अमृतपाल सिंग कोण?
त्यानंतर अमृतपाल सिंगने वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, ज्यात त्याने वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकंच नाही, तर अमृतपालने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही मारण्याची धमकी दिली होती. अमित शाहांना इंदिरा गांधीप्रमाणे किंमत मोजावी लागेल, असं तो म्हणाला होता. त्यामुळे अमृतपालची तुलना भिंद्रनवाल्याशी केली जात आहे.
हेही वाचा >> Nana Patole: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार! पाच नावं स्पर्धेत
23 फेब्रुवारी रोजी अमृतपाल आणि त्यांच्या वारिस पंजाब दे या संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांनी अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तब्बल आठ तास हा सर्व प्रकार सुरू होता. लवप्रीतला सोडण्यासाठी हे करण्यात आलं. लवप्रीत तुफान याला पोलिसांनी बरिंदर सिंग नावाच्या व्यक्तीचं अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, अमृतपाल आणि समर्थकांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी 23 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.
18 मार्चपासून पोलीस घेत होते अमृतपाल सिंगचा शोध
18 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला अटक करण्यासाठी ऑपरेशन हाती घेतलं होतं. यात सात जिल्ह्यातील पोलीस पथकांचा समावेश होता. पोलिसांच्या 50 पेक्षा अधिक गाड्यांनी अमृतपालचा पाठलाग केला होता, जेव्हा तो जालंदरमधील शाहकोट तहसीलला जात होता. अमृतपाल शेवटचा गाडीवरून पळून जाताना दिसला होता.
ADVERTISEMENT