अलिगढ: अलिगढमध्ये काल (9 एप्रिल) एक महिला तिच्या होणाऱ्या जावयासह पळून गेल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आणि आता ते नेमके कुठे दडून बसले आहेत ते ठिकाणही सापडलं आहे. दोघेही उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे आहेत. दोघेही बसने अलीगढहून उत्तराखंडला पोहोचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
कसं सुरू झालं सासू आणि जावयामधील प्रेम-प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, सासूने तिच्या होणाऱ्या जावयाला एक फोन भेट दिला होता. यानंतर दोघांमध्ये फोनवरून बोलणं सुरू झालं. पण गोष्टी इतक्या पुढे गेल्या की सासू आणि जावई हेच एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सासूने तिच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन थेट जावयासह पळ काढला.
महिलेचा पती जितेंद्र म्हणाला की, तो त्याच्या मेहुणीला मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेला होता. पण जेव्हा परत आला तेव्हा त्याला पत्नी घरी दिसली नाही. सुरुवातीला असं वाटलं की, ती कुठेतरी बाहेर गेली असेल, पण अनेक तास झाले तरी ती परतली नाही. त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली. त्याच वेळी असंही कळलं की, जावई देखील बेपत्ता आहे.
जावई सासऱ्याला म्हणाला, "20 वर्षे ठेवलं, आता विसरून जा"
जितेंद्र म्हणाले की, 'त्यांची पत्नी आणि जावई हे अनेक तास फोनवर एकमेकांशी फोनवर बोलत असत. जावई त्यांच्या मुलीपेक्षा सासूशीच जास्त बोलायचा.'
दरम्यान, जेव्हा सासू आणि जावई हे बेपत्ता झाल्याचं समोर आलं तेव्हा जितेंद्रने आपल्या जावयाला फोन केला आणि पत्नीबद्दल विचारणा केली. तेव्हा जावई चक्क असं म्हणाला की, "तुम्ही तिला 20 वर्षे ठेवलं, आता तिला विसरून जा." जावयाचे हे शब्द ऐकून जितेंद्रला मात्र मोठा धक्का बसला.
मुलीचं स्वप्न भंगलं, आईवर संतापली
दरम्यान, ज्या मुलीचं लग्न होणार होतं ती मुलगी या संपूर्ण घटनेमुळे हादरून गेली आहे. एकीकडे घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती, पण तिच्या आईने ज्या पद्धतीने घरातून होणाऱ्या जावयासोबत पळ काढला त्यामुळे मुलीला प्रचंड धक्का बसला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
या घटनेबाबत बोलताना ती म्हणाली की, "आईने माझं सगळं लुटलं. आता माझं तिच्याशी काहीही घेणंदेणं नाही. मला फक्त माझे पैसे आणि दागिने परत हवे आहेत." मुलीच्या म्हणण्यानुसार, आईने 5 लाख रुपयांचे दागिने आणि 3.5 लाख रुपये रोख रक्कम घेऊन घरातून पळ काढला.
पोलिसांनी शोधलं लोकेशन
पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रुद्रपूरमध्ये लपून बसल्याचे समोर आले आहे. जावई आधी तिथे काम करायचा. आता पोलिसांचे पथक दोघांनाही पकडण्यासाठी रुद्रपूरला रवाना झाले आहे.
दरम्यान, या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. मुलगी तिच्या लग्नाची स्वप्ने पाहत असतानाच आईने आणि होणाऱ्या नवऱ्याने ज्या पद्धतीचे कृत्य केलं आहे त्याने दोन्ही कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
