ADVERTISEMENT
नागपूर : नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यानं एका महिला डॉक्टर महिलेला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाने सध्या नागपुरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर झाली होती ओळख
पीडित महिला डॉक्टर आणि आरोपी आयपीएस अधिकाऱ्याची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांमध्ये सुरुवातीला ऑनलाइन संवाद सुरू झाला. संवाद वाढल्यानंतर त्यानंतर त्यांनी फोन नंबर घेतले. त्यानंतर त्यांच्यातली जवळीक वाढली आणि प्रत्यक्ष भेटीगाठींना सुरुवात झाली. या भेटींदरम्यान, आरोपी अधिकाऱ्याने पीडितेसोबत नागपूरसह इतर काही ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
लग्नास नकार दिल्याने तक्रार
महिलेनं आरोपी IPS अधिकाऱ्याकडे लग्नाची मागणी केली असता, त्याने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे निराश झालेल्या पीडितेने अखेर नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याची ओळख उघड केलेली नाही, परंतु तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून, पोलिस पीडितेच्या जबाबासह इतर पुरावे गोळा करत आहेत. सोशल मीडिया संभाषण, फोन कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला जाणार आहे. आरोपी आयपीएस अधिकारी वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या नातेसंबंधांमुळे अशा गंभीर गुन्ह्यांपर्यंत परिस्थिती कशी पोहोचते, यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवरील अशा आरोपांमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले आहे. पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
