Deepak Kesarkar On Badlapur Crime : बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयात चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं संतप्त पालकांनी निषेध मोर्चा काढला आहे. या मोर्चाला हिंसक वळण लागलं असून नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. नागरिकांनी रेलरोको केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत दीपक केसरकर काय म्हणाले?
बदलापूरच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले, बदलापूरला घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक आहे. सकाळी हे कळल्यानंतर मी तातडीनं डिपार्टमेंटची बैठक बोलावली. सात महिन्यांपूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची बैठक घेतली होती. सखी सावित्री समितीने प्रत्येक शाळांमध्ये तातडीनं काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या शाळांमध्ये ती समिती झालीय की नाही? त्याबद्दलची माहिती या रिपोर्टमध्ये लिहिली नाही. मुलींचं संरक्षण हा पहिला विषय असतो. आदेश दिल्यानंतर अशा समित्या स्थापन झाल्या नसतील, त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मी आजच्या आज दिले आहेत. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत, म्हणून आम्ही चर्चा करत आहोत.
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण, संतप्त रेल्वे प्रवाशांची पोलिसांवर दगडफेक!
"प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती"
केसरकर पुढे म्हणाले, सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेत स्थापन झाली, तर मुलींना दिलासा मिळू शकतो. पोक्सो कायद्याप्रमाणे ई-बॉक्स नावाची संकल्पना आहे. परंतु ग्रामिण भागात लहान मुलांना ही संकल्पना समजू शकत नाही. आम्ही ज्यावेळी गृहराज्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळी एक जीआर काढला होता. प्रत्येक शाळा, हॉस्टेल, आश्रमात तक्रार बॉक्स ठेवला पाहिजे. शाळेचा मुख्याध्यावर आण पोलीस प्रतिनिधी यांनी त्या बॉक्समध्ये असलेली तक्रार वाचली पाहिजे. त्या प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही नवीन जीआर काढत आहोत.
हे ही वाचा >> पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट! अल्पवयीन आरोपीची RTO मध्ये झाली १५ दिवसांची ट्रेनिंग, नेमकं काय घडलं?
प्रत्येक शाळेत 'हा' बॉक्स ठेवणं अनिवार्य
प्रत्येक शाळेत हा बॉक्स ठेवणं अनिवार्य आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलींसाठी एक विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या कोणत्याही मुलीवर येता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी माझ्याशी चर्चा केली आहे. लहान मुलांच्या बाबतीत याप्रकरणी अधिक कारवाई झाली पाहिजे. माझ्याकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार, हा प्रकार १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान घडला होता. पालकांनी याची तक्रार १८ तारखेला केली. जवळपास १२ तासांपर्यंत या प्रकरणाची दखल घेण्यात आली नव्हती. संबंधीत खात्याच्या पोलीस निरीक्षकाची गृहमंत्र्यांनी तातडीनं बदली केली आहे. आम्ही शाळेला नोटीस बजावली आहे, असंही केसरकर म्हणाले.
ADVERTISEMENT