बीड: बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलीय. कासलेनं खुलेआम धनंजय मुंडेंसह अनेकांवर जोरदार आरोप केलेत. अटक केल्यानंतर म्हणा किंवा कोठडीत जाताना कासले अगदी हिरो असल्यासारखा मस्तपणे वावरताना दिसतो. आता पोलिसांना रणजीत कासलेच्या मोबाइलमधील डेटा रिकव्हर करायचा आहे. कारण याच मोबाइलवरुन त्यानं अनेक व्हिडीओ करुन गौप्यस्फोट केले आहेत. शिवाय यामध्ये आर्थिक व्यवहाराची देखील माहिती मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
रणजीत कासलेनं केलेले आरोप फारच गंभीर आहेत. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायचा होता असा खळबळजनक दावाही त्यानं केला होता. हा कासले सध्या फारच चर्चेत आहे. हा नेमका कोण आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे हेच आपण जाणून घेऊया.
कोण आहे रणजीत कासले?
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर विभागामध्ये कर्तव्यास होता. या अगोदर रणजीत कासले परळी त्याचबरोबर गेवराई आणि मुंबई, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कर्तव्यास होता, बीडच्या सायबर विभागामध्ये रणजीत कासलेकडे आर्थिक फसवणुकीची केस तपासा कामी आली होती आणि याच केसमध्ये रणजीत कासलेने आर्थिक देवाण-घेवाण करून गैरव्यवहार केला असा ठपका ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर वरिष्ठांची परवानगी न घेता तपास केल्यामुळे रणजीत कासलेला निलंबित करण्यात आले होते.
हे ही वाचा>> कराडच्या Encounter चा दावा, EVM मशीन आणि मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा पोलीस रणजीत कासलेची A to Z माहिती
2014 मध्ये रणजित कासले महाराष्ट्र पोलिसात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाला. रणजित कासलेची पहिली पोस्टिंग मुंबईच्या डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये होती. जिथे त्यानं 2015 ते 2019 पर्यंत, म्हणजे साडेतीन वर्षे सेवा बजावली.
लॉकडाऊननंतर रणजित कासलेची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. औरंगाबादच्या पिसोर पोलीस ठाण्यात एक पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला. या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या वतीने साक्ष देण्यासाठी रणजीत कासलेनं 20 हजार रुपयांची लाच मागितली होती असा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली आणि रणजीत कासलेविरोधात सापळा रचून कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर नंतर कासलेची बीड येथे बदली झाली आणि तो बीडमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये काम करत होता.
रणजीत कासलेचे कारनामे
सायबर पोलिसात काम करत असताना रणजित कासलेकडे सायबर फसवणुकीचा एक गुन्हा आला. रणजित कासले हे त्यांच्या वरिष्ठांना न कळवता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुरतला गेला होता आणि तेथे रणजीत कासलेने पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर 26 मार्च रोजी बीड एसपी नवनीत कांवत यांनी रणजित कासलेला निलंबित केले.
हे ही वाचा>> Crime News : IAS पतीला धोका, गँगस्टरवर जडला जीव अन् नको ते घडलं...
अनुसूचित जमातीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं कासलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कासले हा मूळचा लातूरचा. आमच्या लातूरमध्ये कुत्रा उभा राहिला तरी तो निवडून येईल, असं त्यानं म्हटलेलं. त्यानंतर बीड येथील भगवान कांडेकर यांच्या तक्रारीवरून, 14 एप्रिल रोजी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रणजीत कासलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला.
17 एप्रिल रोजी रणजित कासलेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. रणजीत कासले याला बीड पोलिसांनी अटक केली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला ताब्यात घेताच आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शनचे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे. याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे दिल्याच्या पुराव्यासहित तक्रार दाखल केली आहे.
त्यानंतर अंबाजोगाईतील व्यापारी सुधीर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कासलेने आईच्या उपचारासाठी म्हणून सहा लाख रुपये उसने घेतले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही त्यांनी ते पैसे परत न केल्याने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबतच्या गौप्यस्फोटासह कासलेनं अनेक आरोप केले होते. निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडेंच्या माणसाने आपणाला 10 लाख रुपये दिल्याचा दावा कासलेनं केला होता. त्यानंतर त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
ॲक्सिस बँकेत अमृता फडणवीस काम करतात. त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला त्यांचं अकाऊंट ॲक्सिस बँकेतच काढण्यासाठी धमकावलं जातं, असा गंभीर आरोप कासलेने केला आहे. शिवाय प्रत्येक अकाउंटमागे त्यांना 300 रुपये मिळतात, असा व्हिडीओ त्याने केला होता. तो व्हिडिओ एका वकील महिलेने अमृता फडणवीस यांना टॅग करत खुलासा मागितला होता. त्यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होते. तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का ओढत आहात? असा सवाल करत मुंबई पोलिसांनी कृपया या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती अमृता फडणवीसांनी केली होती.
कासलेनी संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित गंभीर आरोप केले असून, या प्रकरणातील मुख्य राजकीय मास्टरमाईंड अद्याप फरार आहे. त्यामुळे कासलेंना धोका निर्माण होऊ शकतो, असं म्हणत ऑल इंडिया पँथर सेनेच्या दीपक केदारांनी रंजित कासलेंना पूर्ण सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावर दंबग अधिकारी स्टाईल व्हिडीओ टाकण्यावर कासलेचा जोर होता असं दिसतंय. त्याचे तिथे बऱ्यापैकी फॉओअर्स देखील आहेत. कासलेनं केलेल्या आरोपांमध्ये किती तत्थ्य हे तपासात समोर येईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे गंभीर आरोप करणाऱ्या कासलेच्या विरोधात आता गुन्हे दाखल होत आहेत.
ADVERTISEMENT
