Nagpur Crime News : नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. काही चोरटे एका मुलीचा विनयभंग करत होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांना ही घटना कळली. संताप अनावर झालेले वडील टवाळखोरांना जाब विचारला. याच रागातून टवाळखोरांनी नंतर थेट मुलीच्या वडिलांचीच हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : "मीच अपहरण करून संतोष देशमुखांना संपवलं", पोलिसांसमोर 'या' आरोपीची कबुली
मृत नरेश वालदे हे 53 वर्षांचे होते. ते व्यवसायाने चित्रकार होते. गेल्या अनेक दिवसांपासून नरेश वालदे यांच्या मुलीचा आरोपींकडून छळ होत होता. याच कारणावरून काही दिवसांपूर्वी नरेश वालदे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्यावेळी आरोपींनी नरेश वालदे यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
बुधवारी 26 मार्चला दुपारी नरेश वालदे हे कामात व्यस्त असताना त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. वालदे यांना जतरोडी परिसरात भेटण्यास सांगितलं. नरेश वालदे दुचाकीवरून तिथे पोहोचले. तिथे आरोपी ठरल्याप्रमाणे तयार होते. नरेश वालदे तिथे आल्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
हे ही वाचा >> Jalna : शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेला दगडाने ठेचून संपवलं, अंतरवालीमध्ये नेमकं काय घडलं?
नरेश वालदे हे त्यांची वृद्ध आई आणि तीन मुलींसोबत नागपुरातील इमामवाडा परिसरात राहत होते. आरोपी त्यांच्या मुलींना वारंवार त्रास देत असल्याने आरोपींचं टोळकं आणि त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी नरेश वालदे यांच्या घरावर काही अज्ञातांनी रात्री दगडफेक केली होती त्याविरोधात इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी शहरातील इमामवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. नीलेश उर्फ नाना मेश्राम आणि ईश्वर उर्फ जॅकी सोमकुवार अशी आरोपींची नावं आहेत.
ADVERTISEMENT
