The Habitat Studio : मुंबईतील एका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर द हॅबिटॅट हा स्टुडिओ आहे. संगीत, स्टँडअप कॉमेडी, कविता आणि यांसारख्या कार्यक्रमांसाठी 55-70 आसनक्षमता असलेलं ठिकाण आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा कार्यक्रम शूट करण्यात आलं होतं. ज्या दरम्यान त्यानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हॅबिटॅटमधील कार्यक्रम आणि वादाचं समीकरण
मुंबईतील खारमध्ये एका आलिशान परिसरातील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमधील हे ठिकाण आहे. गौरव कपूर, शौर्य त्यागी, सोनाली ठक्कर, बिस्वा कल्याण रथ आणि कनीज सुरका यांसारखे स्टँडअप कॉमेडियन्स इथे कार्यक्रम आयोजित करतात.
हे तेच ठिकाण आहे, जिथे वादग्रस्त ठरलेल्या 'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमाचंही शूट झालं होतं. रणवीर अलाहाबादियाच्या पालकांच्या खासगी आयुष्यावरील विधानावरून झालेल्या मोठ्या वादानंतर 'इंडियाज गॉट लेटेंट'चे निर्माते समय रैना यांनी कार्यक्रम बंद केला.
त्या प्रकरणात अपूर्व मखीजा, युट्यूबर्स आशिष चंचलानी, रणवीर अलाबाडिया, समय रैना आणि शोशी संबंधित इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता द हॅबिटॅट पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आहे.
द हॅबिटॅट कुणाच्या मालकीचं आहे?
'इंडियाज गॉट लेटेंट'चे निर्माते आणि शोचे परीक्षक बलराज सिंग घई यांच्या मालकीचं हे ठिकाण आहे. त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये असं म्हटलं आहे की, मला असे लोक खूप आवडतात जे प्रतिभेचा वापर मूर्खपणासाठी करतात"
द हॅबिटॅट हे ज्या हॉटेलमध्ये आहे, त्या हॉटेल युनिकॉन्टिनेंटलचे मालकही घई हेच आहेत. ते 'द हॅबिटॅट स्टुडिओ, द हॅबिटॅट कॅन्टीन आणि पिंड दा ढाबा'चे मालक आहेत.
हॅबिटॅट स्टुडिओ बंद
कुणाल कामरा यांच्या वक्तव्यावरून रविवारी रात्री शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) नेत्याने हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर सोमवारी त्यांनी एक निवेदन जारी केलं. आम्ही कलाकारांना फक्त सादरीकरणासाठी जागा देतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही मतभेद दूर करण्यासाठी संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या द्वेषाचं समर्थन करत नाही. हिंसा ही कला आणि संवादाच्या आत्म्याला कमकुवत करते,” असं द हॅबिटॅटने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, त्यानंतर हा स्टुडिओ बंद करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
ADVERTISEMENT
