Vishal Agarwal Pune Porsche Accident: पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी (18 मे) मध्यरात्री एका आलिशान पोर्शे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील तरुणी काही फूट वर उडून जमिनीवर आपटली, तर तरुण दुचाकीसोबत काही अंतर फरपटत गेला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी दारुच्या नशेत गाडी चालवत असल्याचा दावा यावेळी अनेकांनी केला. (pune porsche accident who is the father of the young man who crushed the two with a 5 crore porsche car vishal agarwal)
ADVERTISEMENT
महत्वाचं म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला 15 तासातच जामीन मंजूर झाला. हा आरोपी बड्या उद्योजकाचा मुलगा असल्याचं समोर आलं. आरोपी चालवत असलेली पोर्शे कार जवळजवळ 5 कोटींची होती. 17 वर्षाच्या या मुलाला 5 कोटींची पोर्शे कार चालवायला देणारे त्याचे वडील कोण, त्यांची पुण्यात ओळख काय? हे सगळे प्रश्न या नंतर आपोआप चर्चेत आले, याचविषयी आपण जाणून घेऊया
कोण आहेत विशाल अग्रवाल...
पुण्यातल्या या हायव्होल्टेज अपघातानंतर आरोपीला अटक तर झाली पण पोलिसांनी 15 तासांच्या आत आश्चर्यकारक अटींवर त्याला जामीन मंजूर केला. त्याला या प्रकरणावर निबंध लिहण्याची आणि 15 दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर पुण्यातील वातावरण तापलं आणि नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला.
पोलीस चौकशी दरम्यान या आरोपीनं देखील कबुली दिली. 'मी कार चालविण्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार मला दिली. मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्याची परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे.' असं या अल्पवयीन आरोपीने पोलीस जबाबात सांगितलं.
आता या नंतर चर्चा होऊ लागली ती म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातानंतरही 15 तासांच्या आत जामीन मिळणाऱ्या या तरुणाचे वडील नेमके कोण आहेत.
या तरुणाच्या वडीलांचं नाव विशाल अग्रवाल. पुण्यात एका बड्या बिल्डरच्या नावानं ते प्रसिद्ध आहेत. पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे ते प्रमुख आहेत. ब्रह्मा कॉर्प हे पुण्यापुरतं मर्यादीत नाही तर संपूर्ण भारतात हे नाव प्रसिद्ध आहे. Real Estate, Construction, Residential Projects, Commercial Projects, Hotels, Resorts, Clubs यासाठी ब्रह्मा कॉर्प हे ओळखलं जातं. याचं ब्र्म्हा कॉर्पचे प्रमुख विशाल अग्रवाल हे आहेत. पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात इस्टेट्स आहेत.
विशाल अग्रवाल यांच्या मुलाला जरी जामीन या प्रकरणात मिळाला असला तरी त्यांना मात्र अटक झाली आहे.
अल्पवयीन असूनही आरोपीला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल, त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल पसार झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू झाला. अखेर पुणे पोलिसांनी त्यांना संभाजीनगरमधून अटक केली.
पुण्यात कल्याणीनगर येथे घडलेलेल्या या अपघाताने एकच खळबळ माजली आहे. यावरुनच आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT