योगेश काशिद, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली. तुरुंगातच या दोन्ही आरोपींना इतर दोन आरोपींनी मारहाण केल्याने तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते तर मकोका अंतर्गत अटकेता असलेला आरोपी अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करणारे दोन आरोपी कोण?
महादेव गित्ते हा परळीचा असून शशिकांत उर्फ बबन गित्ते यांचा तो भाऊ आहे. परळी मतदारसंघातील सरपंच बापू आंधळे यांची भर चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं असून या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते आणि शशिकांत उर्फ बबन गित्ते आहेत. यापैकी बबन गित्ते हा अद्यापही फरार असून महादेव गित्ते हा जिल्हा कारागृहामध्ये आहे.
हे ही वाचा>> वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत तुरुंगात काय घडलं? दोन टोळ्या भिडल्याच्या माहितीनंतर खळबळ
गित्ते गँग आणि कराड यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय वाद आहे. परळी मतदारसंघांमध्ये या दोन्ही अनेकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं आहे.
नेमका कोण आहे अक्षय आठवले?
अक्षय आठवले हा सनी आठवलेचा भाऊ असून बीड शहरामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मकोका अंतर्गत झालेल्या कारवाईमध्ये आठवले गँगवर कारवाई करण्यात आली होती.
ही कारवाई वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाल्याची माहिती त्यांना मिळाल्याने आठवलेचा सुरुवातीपासूनच वाल्मिक कराड याच्यावर राग असल्याचं बोललं जात आहे. अक्षय आठवलेवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत. अक्षय आठवलेला तडीपार करण्यासाठी वाल्मिक कराडने पोलिसांकडे शिफारस केल्याची माहिती देखील समोर आली होती.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh: 'सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झालेली सुदर्शन घुलेला मारहाण', कोण आहे हा सुग्रीव कराड?
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली. तुरुंगात असलेल्या वाल्मिकला बरीच सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता त्याला तुरुंगातच मारहाण केल्याचं समोर आलं आहे. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी ही मारहाण केल्याची चर्चा आहे.
महादेव गित्तेला हरसूल कारगृहात हलवलं.
वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना जिल्हा कारागृहामध्ये मारहाण केल्याची माहिती समोर आल्यानंतर आरोपी महादेव गित्ते याला तात्काळ बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात हलविण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
