मुंबई: अतिक अहमद (Atiq Ahmed) जेलमध्ये गेल्यानंतर उदय झाला लेडी डॉन शाइस्ता परवीनचा. वॉण्टेड क्रिमिनल यादीत असलेली शाइस्ता लोकांना धमकावणं, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं.. या सगळ्या गोष्टी बड्या खुबीने करायची. हीच शाइस्ता आता उत्तर प्रदेशांच्या (Uttar Pradesh) मोस्ट वॉण्टेड लिस्टमध्ये आहे. पोलिसाच्या घरात जन्माला आलेल्या शाइस्ताचं उत्तर प्रदेशच्या राजकारणात गुंडांच्या यादीत नाव कसं आलं आणि उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सलाही गुंगारा देणारी, उमेश पाल हत्याकांडात आरोपी असणारी ही लेडी डॉन शाइस्ता परवीन आहे कोण? अतिक अहमदची गँग कशी सांभाळायची शाइस्ता? याचविषयी आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
अतिक अहमदच्या शूट आउटनंतर आता उत्तर प्रदेशची स्पेशल टास्क फोर्स शाइस्ता परवीनचा शोध घेतेय. अतिकच्या मृत्यूनंतर अतिकच्या काळ्या कारनाम्यांची सारी माहिती शाइस्ताकडे असल्याने पोलीस तिचा शक्य त्या सर्व ठिकाणी शोध घेताहेत. शाइस्ताचं माहेर असलेल्या चकीयामध्येही पोलिसांनी छापे मारले. पण शाइस्ताची माहेरची माणसं घर उघडंच ठेवून गायब झाल्याचं पोलिसांना आढळलं.
शाइस्तासाठी कौसंबी, ग्रेटर नॉएडा, मेरठ, दिल्ली, ओखला, पश्चिम बंगाल आणि मुंबईतही पोलीस शोध घेताहेत. ही लेडी डॉन पोलिसांसाठी महत्त्वाची का झालीय? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्याचं उत्तर पुढे आहे.
गृहिणी ते लेडी डॉन
शाइस्ता परवीनचा विषय येतो त्याबरोबर उमेश पाल हत्याकांडाचा विषय येतोच. कारण उमेश पाल हत्याकाडांनंतर तिसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला शाइस्ता परवीनने लिहिलेली एक चिट्ठी आता व्हायरल होत आहेत. ज्यात शाइस्ताने अतिक आणि त्याच्या मुलांच्या सुरक्षेची मागणी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
एका नेत्याने उमेश पालचा खून करवला आहे आणि त्या खुनाच्या आरोपात अतिक आणि अश्रफ आणि असदला अडकवलंय असा आरोप शाइस्ताने केल्याचं समोर आलं. पण ही चिठ्ठी आता अतिक, अश्रफ आणि असदच्या मृत्यूनंतर समोर आली आहे. शाइस्ता स्वतःसुद्धा उमेश पाल हत्याकांडातली एक संशयित आरोपी आहे.
हे ही वाचा>> कुत्र्यामुळे झालेला पाणउतारा… मुंबईची अभिनेत्री थेट शारजाहच्या तुरुंगात : वाचा भयंकर बदल्याची गोष्ट
अतिकच्या शूट आउटनंतर शाइस्ताचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. पोलिसांनी या लेडी डॉनवर 50 हजारांचं बक्षीस लावलंय. शाइस्ता परवीन ही मुलासाठी आणि पतीसाठी फक्त चिठ्ठी लिहून न्याय मिळण्याची वाट पाहणारी साधीसुधी गृहिणी नाही. तिचा प्रवास गृहिणी ते राजकारणी व्हाया गँग चालवणारी डॉन असा आहे.
उत्तर प्रदेशात आज तिची ओळख एक लेडी डॉन अशी दिली जाते. शाइस्ताच्या डॉन होण्याची गोष्ट सुरू होते अतिक अहमदपासून.
शाइस्ता परवीनचं कुटुंब अलाहाबादच्या प्रयागराजमधल्या दामुपूर गावात रहायचं. शाइस्ता धरुन 4 बहिणी आणि 2 भाऊ. आता शाईस्ताचे दोन भाऊ मदरशात प्रमुख पदावर आहेत. ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेली शाइस्ता एका पोलिसाची मुलगी. बोलायला हुशार होती. 1996 मध्ये अतिक नेता आणि गुंड म्हणून उत्तर प्रदेशात ओळखला जात होता. त्याचा दरारा वाढला होता. अतिक उत्तर प्रदेशात बाहुबली नेता होता. दोघांच्या कुटुंबाची एकमेकांशी ओळख होती.
हे ही वाचा>> मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भोजपुरी अभिनेत्रीला रंगेहाथ अटक
शाइस्ता त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली होती. पण त्याचा दरारा आणि नाव बघून शाइस्ताने आणि तिच्या कुटुंबाने अतिकच्या स्थळाला होकार दिला. 1996 मध्ये शाइस्ता आणि अतिकचं लग्न झालं. एन्काउंटरमध्ये मारला गेलेला 19 वर्षांचा असद धरुन शाइस्ता आणि अतिकला एकूण 5 मुलं. शाईस्ता 12 वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घरकामच करायची. पण अतिक अहमद तुरुंगात गेला आणि त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांची जबाबदारी शाइस्ता सांभाळू लागली. अतिक अहमद बाहुबली नेता झाला. पण त्याने केलेल्या कामांमुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. अतिक तुरुंगात होता आणि त्याचा सर्व कारभार सांभाळत होती त्याची बायको शाइस्ता परवीन. कधी त्याच्या सल्ल्याने तर कधी स्वतःच्या मर्जीने.
उमेश पाल हत्याकांडातही शाइस्ता एक आरोपी आहे. तुरुंगात असलेल्या आपल्या नवऱ्याला शाइस्ता भेटायला जायची. अतिक आणि शाइस्ता यांच्यात साबरमती तुरुंगात झालेल्या चर्चेच उमेश पालच्या हत्येचा कट शिजला होता. अतिक तुरुंगात असताना त्याने उमेश पालच्या हत्येसाठी ऑर्डर्स दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हा फोन त्याने शाइस्ताकडूनच मागून घेतला होता. याच फोनवरुन अतिक तुरुंगातून त्याच्या शूटर्सशी बोलायचा. शाइस्ताला उमेश पालच्या खुनाबद्दल माहिती होती असं म्हटलं जातं. फक्त उमेश पाल हत्याकांडच नाही तर अतिकच्या सर्व काळ्या व्यवहारांची सूत्रं अतिक जेलमध्ये असताना शाइस्ताच्या हाती होती.
अतिकच्या ज्या काळ्या व्यवहाराची माहिती पोलीस इतके दिवस अतिककडून मिळवण्याचा प्रयत्न करत होते त्याच्या मृत्यूनंतर आत ती सर्व माहिती त्यांना दोन माणसं देऊ शकतात एक आहे शाइस्ता परवीन आणि दुसरा आहे गुड्डू मुस्लिम.
हे ही वाचा>> CCTV: पुण्यात तरुणाने थेट महिलेच्या कानशिलात लगावली, उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं?
त्यामुळे शाइस्ता मिळावी म्हणून अतिकच्या संपत्तीवरही टाच आणण्याच्या हालचाली सध्या उत्तर प्रदेश सरकारने सुरू केल्या आहेत. शाइस्ता खंडणी वसुलीचं काम करायची. त्यासाठी ती लोकांना धमक्या द्यायची. जिशान नावाच्या एका बिल्डरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यालाही खंडणीसाठी शाइस्ताने अनेकदा फोन केले आहेत.
एकीकडे नवऱ्याचे सर्व काळे धंदे सांभळणाऱ्या शाइस्ताने राजकारणातही प्रवेश केला होता. जानेवारी 2023 मध्ये तिन बसपा जॉइन केलं होतं. शाइस्ताला महापौर पदासाठी निवडणूक लढण्याची संधी होती. पक्षाकडूनही तिचा विचार सुरू होता. पण 24 फेब्रुवारीला उमेश पाल हत्याकांड झालं आणि त्यानंतर शाइस्ता स्वतःच फरार झाली. त्यानंतर महापौरपदाच्या उमेदवारीतून तिचं नाव काढून टाकण्यात आलं. यावर बसपाचे विधीमंडळ नेते उमा शंकर सिंह यांनी आरोप केला होती की शाइस्ता निवडणूक जिंकली असती म्हणून मग तिचं नाव उमेश पाल हत्याकांडात गोवण्यात आलं.
शाइस्ता परवीन अशी डॉन आहे की जिच्या 19 वर्षांच्या मुलाचा एन्काउंटर झाला, पती अतिक अहमद आणि दीर अश्रफ अहमदचा शूट आऊट झाला. पण फरार शाइस्ताकडे लपून राहण्याशिवाय पर्याय नाही. शाइस्ता सरेंडर करेल अशी चर्चा अतिकच्या शूट आऊटनंतर सुरू झाली होती. पण ती बाहेर आली नाही. आता शाइस्तासाठी पोलीस जाळं लावणार की गुंडगिरी संपवण्याच्या उत्तर प्रदेशातल्या पोलिसांच्या मोहिमेत तिला एलिमिनेट केलं जाणार? हा सध्या उत्तर प्रदेशातल्या गल्ल्यांमधला आणि राजकारणातला चर्चेचा विषय आहे.
ADVERTISEMENT